वास्तववादाने महाभारतातील अनेक कोडी सोडवणारी कादंबरी.
लहानपणापासून मी महाभारत अनेकदा वाचलंय , कधी गोष्टीरूपात तर कधी कादंबरी स्वरूपात. या प्रत्येक वाचनात महाभारता बद्दलचं गूढ वाढतच गेलं व नंतर हळूहळू ते वाढलं कि महाभारत हे वास्तववादी न वाटता एक रचित काल्पनिक कथानक वाटू लागलं व याला
कौरव पांडवांच्या जन्माच्या गुढापासूनचे अनेक प्रश्न होते, मंत्राने कर्णाचा व इतर पांडवांचा जन्म झाला याचं स्पष्टीकरण कसं असेल ? समाज स्वीकारार्ह मुलं पंडुराजा सोबत असताना कशी झाली असतील? एवढे १०० कौरवांना गांधारीने कसा जन्म दिला असेल ? चिरंजीवी भीष्म काय वयाचे असतील ? ते रणात शर शय्येवर झोपले म्हणजे नक्की काय ?आंधळ्या धृतराष्ट्राचा विवाह गांधारीशी का व कसा झाला असेल ? भैरप्पांनी हे समजावताना समाजप्रथांचे साधार प्रमाण असे दिले आहेत कि आपल्याला सहज पटतं.
भीष्म जन्म समजण्यासाठी आपल्याला शंतनू व गंगा नदी यांच्यामधला विवाह व त्याच देवत्व आणि शापित्व असं बराच काही समजावं लागतं. भैरप्पांनी मात्र ते सहजपणे मानवी स्वभावात व जमातींच्या चालीरीतींच्या चौकटीत बंदिस्त केलं आहे व असं घडणं शक्य आहे व तेदेखील गंगेच्या आधीच्या सात पुत्रांना न मारता , हे आपण मान्य करतो.
द्यूतसभेतील द्रौपदी वस्रहरणाचा प्रसंगच घ्या ना. सर्व कथानकं कृष्णाला देवत्व बहाल करत असताना भैरप्पा मात्र मानवी चौकटीत द्रौपदीच्या भर सभेतील कृष्ण सामर्थ्याच्या धमकीने हा प्रश्न चुटकीसरशी सोडवतात.
असा कोणताही प्रसंग असो, तुम्हाला याच मातीच्या पावलात त्याचं उत्तर नक्कीच मिळेल व खात्री पटेल कि अशा घटना घडली कशा असतील. संजयने धृतराष्ट्राला युद्ध प्रसंग कसे सांगितले असतील? भीमाने हिडिंबा , बकासुर अशा राक्षसांचा सामना कसा केला असेल? अर्जुन नागलोकात , देवलोकात म्हणजे नक्की कोठे गेला असेल? तो देवराज इंद्राला असा भेटला असेल?…. या सर्व प्रश्नांना केवळ आपल्याला समाधानकारक उत्तरेच मिळतात असे नाही तर आपणही त्या पद्धतीचा विचार करायला उद्युक्त होतो हेच या पुस्तकाचे मोठे यश आहे.
ज्यांनी महाभारत वाचलंय त्यांनी तर पर्व वाचायलाच हवी. १९९१ मध्ये मराठीत डॉ सौ उमा कुलकर्णी यांनी अनुवादित केलेलं हे पुस्तक माझ्या खूपच उशिरा म्हणजे गेल्यावर्षी हातात पडलं. हल्लीच मी ते दुसऱ्यांदा वाचायला घेतलं. मूळ कन्नड पुस्तक तर १९७९ सालचं आहे. यात भैरप्पांची प्रचन्ड भटकंती व मेहनत आहे यामुळेच एका महाकाव्याचे सहज सोपे सादरीकरण करणारे ते आधुनिक व्यास महर्षींच ठरतात
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा