गुरुवार, १७ फेब्रुवारी, २०२२

स्वयंभू - डॉ. पद्माकर विष्णु वर्तक

 प्रथमावृत्ती : १९७१, सहावी आवृत्ती : २००९ 


भीम या एका स्वयंभू पांडवावर सुमारे ५० वर्षांपूर्वी डॉ. प. वि. वर्तक यांनी लिहिलेले हे पुस्तक म्हणजे केवळ भीमावरील हे पहिले (व कदाचित एकमेव)  पुस्तक असावे. १९७१ साली लिहिलेल्या या पुस्तकात त्यांनी १९८८ साली तिसरी आवृत्ती काढताना एक महत्वाची भर घातली ती म्हणजे महाभारत युद्धाचा कालखंड ठरविण्याची. महाभारतातील विविध पर्वांत आलेल्या खगोलशास्त्रीय श्लोकांचा आधार घेत त्यांनी महाभारत युद्ध इ. स. पूर्व ५५६१ साली झाले असे प्रतिपादिले आणि एका वेगळ्या चर्चेला देखील तोंड फोडले. त्यांचे हेच वर्ष प्रमाण मानत  डॉ. निलेश ओक यांनी पुढे त्याचा वेगळा अभ्यास केला व स्वतःचे वेगळे संदर्भ देत १६ ऑक्टो. ५५६१ हि युद्धाच्या पहिल्या दिवसाची तारीख असल्याचे जाहीर केले. 


भीम स्वयंभूच होता हे प्रतिपादताना श्री वर्तक यांनी भीमाची पुराणकथाकारानी व कीर्तनकारांनी रंगविलेली आडदांड , खादाड, अविचारी,शीघ्रकोपी, व पटकन भावनाविवश होऊन निर्णय घेणारा पांडव, अशी प्रतिमा कशी चुकीची आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी त्यांनी भीमाबद्दलची महाभारतातील प्रतिमा २ भागांमध्ये विभागली आहे. पहिला भाग हा भीम हा एक उपेक्षित पण विद्वान मुत्सद्दी असल्याचे पटविणारा तर दुसरा भाग भीम कसा मूर्तिमंत पराक्रमाचे प्रतीक होता हे दर्शविणारा. आणि या दोन्ही प्रकारातून त्याच्या अजोड बुद्धिमत्तेने आणि अतुलनीय पराक्रमामुळे भीम महाभारताचा नायक कसा ठरतो हे वाचकांना पटविण्यात श्री प वि वर्तक यशस्वी झाले आहेत. 


पांडवांच्या बालपणापासूनच्या विविध प्रसंगातील भीमाच्या मुत्सद्दीपणाची बरीच उदाहरणे वर्तकांनी घेतली आहेत. लाक्षागृह प्रसंगातील त्याची सावधानता, त्यातून बाहेर पडल्यावर एकट्या भीमाने चौकसपणे आपल्या मातेचा व भावंडांचा केलेला सांभाळ, हिडिंब वध , द्रौपदी स्वयंवराच्या वेळी त्याने केलेली अर्जुनाची पाठराखण,पुढे जरासंधवध, राजसूय यज्ञातील दिग्विजय प्रसंगी भीमाचा पराक्रम इ अनेक घटनाक्रमातून भीमाची चौकसता व पराक्रम सिद्ध होतोच पण द्रौपदी वस्रहरणाच्या प्रसंगात द्रौपदीची लाज कुणामुळे राखली गेलू असेल तर ती दूरस्थ कृष्णामुळे नसून राजसभेत दास म्हणून उभ्या असलेल्या पण संतप्त झालेल्या भीममुळेच. या घटनेचे साद्यन्त वर्णन करताना द्रौपदी वस्रहरणाचा प्रसंग प्रत्यक्ष घडलाच नसल्याचे भांडारकर प्रतीतील सुमारे ३० प्रसंगातून कसे समजते हे वाचकांच्या लक्षात आणून दिले आहे. 


धर्माच्या स्वरूपावर देखील भीमानेच वेळोवेळी युधिष्ठिराशी वाद घातला आहे. सभापर्वात, द्युतामुळे आपल्यावर ओढविलेल्या प्रसंगामुळे, भीम वनपर्वात युधिष्ठिराला दोष देतानाही दिसतो. जो धर्म सुहृदांच्या आणि आपल्या अपकर्षास कारण ठरतो तो म्हणजे दुःखाचे अथवा अधर्माचेच बीज आहे याची जाणीव युधिष्ठिराला करून देताना तो महान तत्ववेत्ताच वाटतो. पण याच वनवासात भीम प्रगल्भही होत गेला आहे. दुर्योधनासारखा आपला शत्रू आपल्याकडून द्युतात हिसकावून आपल्या संपत्तीवर स्वतःचे राज्य व प्रभाव वाढवितो आहे याची त्याला जाणीव आहे. 


वनात पांडवांवर येणाऱ्या संकटाचे निराकरण प्रसंगी भीमाने एकट्याने केले आहे. किर्मीर व जटासुराचा वध हि त्याचीच उदाहरणे. द्रौपदीला पळवून नेऊ इच्छिणाऱ्या जयद्रथाला शासन भीममुळेच सहजशक्य झाले. वनवासात द्रौपदीची सर्वात जास्त काळजी कोणी वाहिली असेल तर ती भीमानेच. तिचे सगळे हट्ट देखील त्यानेच पुरविले आहेत. पुढे अज्ञातवासात असताना प्रथम किचक व नंतर अनुकिचकांच्या तावडीतून द्रौपदीला सोडविले ते देखील भीमानेच. 


असा वैयक्तिक पराक्रम करणारा भीम युद्धभूमीवरील पराक्रमी सेनानी म्हणून झळाळून उठतो. राजसूय यज्ञाकरिता जेव्हा दिग्विजयाची वेळ आली तेव्हा जरासंधाच्या वधानंतर त्याने पूर्व दिशेकडील राजे पादाक्रांत केले. यात अंगदेशाचा तत्कालीन राजा कर्ण देखील होता. कर्णाचा असाच पराभव त्याने महाभारत युद्धात देखील केलेला आढळतो. या महाभारत युद्धात दुर्योधनाचे सर्व बंधू देखील भीमानेच मारले. पण यातील विकर्णाला मारल्यावर मात्र तो हळवा  झाला कारण याच विकर्णाने भरसभेत द्रौपदीचा अपमान होत असताना त्याविरुद्ध बोलण्याचे धाडस केले होते. दुःशासनाला मारताना मात्र त्याने आपले क्रौर्य पुरेपूर प्रकट केले. भीमाच्या या युद्धातील पराक्रमाची वेगवेगळ्या युद्ध पर्वात येणारी वर्णने श्री वर्तकांनी वेचून शब्दबद्ध केली आहेत. 


महाभारत युद्धाचा कालखंड : 


पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीत जोडलेल्या भागात श्री. प. वि. वर्तक यांनी महाभारत युद्धाच्या संभाव्य कालखंडाचा विस्तृत आढावा घेतला आहे. यात विविध पुराणात उपलब्ध असलेल्या राजवंशांच्या वंशावळीपासून महाभारतात उपलब्ध असलेल्या महत्वाच्या खगोल निरीक्षणात्मक श्लोकांचे विवेचन आहे. सुप्रसिद्ध अरुंधती वसिष्ठ प्रमेयाला यात श्री वर्तकांनी पहिल्यांदा ओझरता स्पर्श केल्याचे आपल्याला आढळते. रोहिणी शकटभेद, विविध ग्रहांचे वक्री होण्याचे संदर्भ, तैत्तिरीय ब्राह्मणातील काल , वेदकाल , उत्खनन शास्त्र, या साऱ्यांचा आढावा घेत त्यांनी इ.स. पूर्व ५५६१ हे वर्ष सुचविले आहे. त्यामुळे या कालगणनेत रस असणाऱ्या वाचकांनी या पुस्तकातील हि तोंडओळख तरी नक्की वाचायला हवी. अलीकडच्या काळात यावर बरेच संशोधन होऊन वेगवेगळे कालखंड पुढे केले गेले आहेत व यातदेखील श्री वर्तकांचे हे कार्य निश्चितच पायाभूत ठरणारे आहे यात शंकाच नाही. 


२ टिप्पण्या:

Hemant म्हणाले...

खूप छान माहीती!

गजशारदा म्हणाले...

सुंदर माहिती मिळाली