नासदीय सूक्त १०. १२९
ऋग्वेदाच्या १०व्या मंडलातील १२९ सूक्त नासदीय सूक्त म्हणून ओळखले जाते कारण याची सुरुवातचाच “ना असत” या शब्दांनी होते. अवघ्या ७ ऋचांचे हे सूक्त सृष्टीनिर्मितीबद्दलचे अतिशय उत्कृष्ट सूक्त मानले जाते. या सूक्ताचा कर्ता ऋषी मात्र ज्ञात नाही. याची रचना त्रिष्टुप छंदात केलेली आहे. बुद्धी व कल्पनाशक्तीचा अतर्क्य मिलाप दाखविणारे हे सूक्त खरंच वाखाणण्याजोगे आहे. सृष्टिपूर्व प्रलयावस्था, जीवनिर्मिती, सृष्टीनिर्मितीची अगम्यता असे विविध विषय आपल्याला या लघुसूक्तात पाहायला मिळतात. सत (व्यक्त जग) व असत (अव्यक्त जग) यातील काहीच अस्तित्त्वात नसण्यापासूनच सर्व जगाच्या निर्मितीची सुरुवात होते, अशा प्रकारचे वर्णन यातील ऋचांमध्ये येते. या सुक्तानेच अद्वैत सिद्धांताचा पाय घातला असावा.
नासदासीन्नो सदासीत्तदानीं नासीद्रजो नो व्योमा परो यत् । किमावरीवः कुह कस्य शर्मन्नम्भः किमासीद्गहनं गभीरम् ॥१।।
जेव्हा असत नव्हते आणि सत देखील नव्हते, त्याठिकाणी कोणतेही लोक (सप्तलोक, सप्तपाताळ यापैकी) नव्हते , व्योम नव्हते, अशा स्थितीत हे आवरण कुणी निर्माण केलं? कुणाच्या आनंदासाठी निर्माण केलं ? आणि खळ खळ आवाज करणारे हे काय होते? हे खरंच गूढ आणि गहन आहे.
न मृत्युरासीदमृतं न तर्हि न रात्र्या अह्न आसीत्प्रकेतः । आनीदवातं स्वधया तदेकं तस्माद्धान्यन्न परः किं चनास ॥२।।
तिथे मृत्यूही नाही आणि अमृतही नाही. रात्रही नाही आणि दिवसही नाही. आणि वाट (वायू) नसतानादेखील काही प्रक्रिया घडत आहे. तिथे कुणीही अन्य दिसत नाही.
तम आसीत्तमसा गूळ्हमग्रेऽप्रकेतं सलिलं सर्वमा इदम् । तुच्छ्येनाभ्वपिहितं यदासीत्तपसस्तन्महिनाजायतैकम् ॥३।।
आता या अंधारात काही दिसू लागलं आहे. प्रथम तम् रूप आणि आकार नसलेले निराकार गतिमान जलतत्त्व सर्वत्र भरून राहिले.. काही तुच्छ (लहान) काही तेजस्वी असे काही. ते तपाने एका बीजरुपात अवतीर्ण झाले.
कामस्तदग्रे समवर्तताधि मनसो रेतः प्रथमं यदासीत् । सतो बन्धुमसति निरविन्दन्हृदि प्रतीष्या कवयो मनीषा ॥४।।
ज्यांना वाढण्याची इच्छा होती ते मोठे झाले. यातून निर्मितीची इच्छा तयार झाली. व दोन ज्ञानी माहात्म्यांमधे अस्तित्त्वाची बंधुभावाची बीजे रोवली गेली, इच्छा तयार झाली.
तिरश्चीनो विततो रश्मिरेषामधः स्विदासी३दुपरि स्विदासी३त् । रेतोधा आसन्महिमान आसन्त्स्वधा अवस्तात्प्रयतिः परस्तात् ॥५।।
त्यांच्या तिरप्या किरणांच्या मोजमापांतून खाली वर अशी दिशांची निर्मिती झाली. ज्याला महान व्हायचे होते त्याने स्वतः हून या प्रक्रियेला सुरुवात केली.
को अद्धा वेद क इह प्र वोचत्कुत आजाता कुत इयं विसृष्टिः । अर्वाग्देवा अस्य विसर्जनेनाथा को वेद यत आबभूव ॥६।।
कोण समजेल वेद? याच्याबद्दल कोण सांगेल? हि विशेष सृष्टी कुठून आली? देवसुद्धा या प्रक्रियेत नवीन आहेत. त्यांना तरी याबद्दल माहित असेल का?
इयं विसृष्टिर्यत आबभूव यदि वा दधे यदि वा न । यो अस्याध्यक्षः परमे व्योमन्त्सो अङ्ग वेद यदि वा न वेद ॥७।।
या सृष्टीत जे घडलेले आहे ते जाणणारा अथवा न जाणणारा अस्तित्त्वात असेल का ? तो अध्यक्ष कुठेतरी उच्च आकाशात आहे त्याला तरी हे माहित असेल का? किंवा त्यालाही हे माहीत नाही.
अशा रीतीने नासदीय सूक्त अनेक प्रश्न निर्माण करत सृष्टी कशी निर्माण झाली असेल याचे उत्तर द्यायचा प्रयत्न करीत, शेवटी हा प्रश्न अनुत्तरीतच ठेवते. यात या सूक्ताच्या कर्त्यांची बुद्धिझेप खरंच उत्तुंग आहे.