पुरुष सूक्त हे ऋग्वेदाच्या १० व्या मंडलातील ९० वे सूक्त आहे. यात १६ ऋचांमध्ये विराट पुरुषाचे व पृथ्वीवरील जीवोत्पत्तीचे वर्णन आहे. यातील सुरुवातीच्या ५ ऋचा विराट पुरुषाच्या वर्णनाच्या आहेत तर उरलेल्या ११ ऋचांमध्ये विश्वनिर्मितीची प्रक्रिया कशी साकारत गेली असावी याचे वर्णन आहे. या सूक्ताचा कर्ता ऋषी “नारायण” असून देवता “पुरुष” आहे.
स॒हस्र॑शीर्षा॒ पुरु॑षः सहस्रा॒क्षः स॒हस्र॑पात् । स भूमिं॑ वि॒श्वतो॑ वृ॒त्वात्य॑तिष्ठद्दशाङ्गु॒लम् ॥१।।
या पहिल्या मंत्रामधून आपल्याला एका सहस्त्र शीर्ष असलेल्या विराट पुरुषाचे वर्णन मिळते. यातील सहस्त्र हा शब्द “असंख्य”, “अनंत”, ”विराट” अशा अर्थाने येतो कारण या पुरुषाला जशी सहस्त्र शीर्षे आहेत तसेच त्याला सहस्त्र अक्ष (डोळे) व सहस्त्र पाद देखील आहेत. तो एवढा विशाल आहे कि सर्व जगताला व्यापल्यानंतरही दशांगुळे उरला आहे.
पुरुष एवेदं सर्वं यद्भूतं यच्च भव्यम् । उतामृतत्वस्येशानो यदन्नेनातिरोहति ॥२॥
हा जो विराट पुरुष आहे तो सर्व सृष्टीचा स्वामी आहे. जे पूर्वी होऊन गेले अथवा जे पुढे घडायचे आहे त्याचाही स्वामी हाच आहे. अमृत व जरा मृत्यूरहीत स्थितीचा स्वामी देखील तोच व जे अन्न प्राशन करून वाढतात त्या प्राण्यांचा स्वामी हाच आहे.
एतावानस्य महिमातो ज्यायाँश्च पूरुषः । पादोऽस्य विश्वा भूतानि त्रिपादस्यामृतं दिवि ॥३।।
एवढा मोठा महिमा असलेला हा पुरुष एवढा विराट आहे कि हे भूत विश्व त्याच्या केवळ एक चतुर्थांश भागात सामावलेले आहे तर त्याचे इतर ३ भाग अंतराळात आहेत. म्हणजेच ते एवढे विशाल आहेत कि आपल्याला त्याचा थांग लागू शकत नाही.
त्रिपादूर्ध्व उदैत्पुरुषः पादोऽस्येहाभवत्पुनः । ततो विष्वङ्व्यक्रामत्साशनानशने अभि ॥४।।
असा हा तीन ऊर्ध्व पद अंतराळात असलेला पुरुष अवतीर्ण झाला. त्याचा हा ४ था पदांश प्रलय व निर्मिती या सृष्टिनिर्मिती प्रक्रियेतून जात असतो. साशन (अन्नामुळे चेतन असलेले ) व अनशन (अन्न नसल्याने अचेतन असलेले ) असे दोन्ही पदार्थ त्याने व्यापून टाकले.
तस्माद्विराळजायत विराजो अधि पूरुषः । स जातो अत्यरिच्यत पश्चाद्भूमिमथो पुरः ॥५।।
यातूनच “विराट” पुरुष उत्पन्न झाला. पण परमात्मस्वरूप पुरुष त्याहीपेक्षा वर होता. विराट पुरुषाने त्यापुढे जात, भूमी व पुरे (शरीरे) निर्माण केली.
यत्पुरुषेण हविषा देवा यज्ञमतन्वत । वसन्तो अस्यासीदाज्यं ग्रीष्म इध्मः शरद्धविः ॥६।।
जेव्हा या विराट पुरुषाला यज्ञार्पणाचा हवि योजला तेव्हा वसंत ऋतू त्याचा आज्य (घृत) बनला, ग्रीष्म ऋतू इंधन (समिधा) व शरद ऋतू हवि (आहुती) झाला.
तं यज्ञं बर्हिषि प्रौक्षन्पुरुषं जातमग्रतः । तेन देवा अयजन्त साध्या ऋषयश्च ये ॥७।।
या मानस यज्ञातून जो सर्वांच्या पूर्वी उत्पन्न झाला, त्यावर प्रोक्षण (सिंचन ) आणि या हवनयोग्य पुरुषाच्या योगाने देवांनी आणि “साध्य” (नावाच्या) ऋषींनी त्याचे यजन केले.
तस्माद्यज्ञात्सर्वहुतः सम्भृतं पृषदाज्यम् । पशून्ताँश्चक्रे वायव्यानारण्यान्ग्राम्याश्च ये ॥८।।
सर्व प्रकारची आहुती दिलेल्या त्या यज्ञापासून पृषत (दही) व आज्यम (घृत) जमा झाले. व त्यानंतर पशु, हवेतील पक्षी, अरण्यातील प्राणी, ग्रामपशू आदी निर्माण झाले.
तस्माद्यज्ञात्सर्वहुत ऋचः सामानि जज्ञिरे । छन्दांसि जज्ञिरे तस्माद्यजुस्तस्मादजायत ॥९।।
सर्व प्रकारची आहुती दिलेल्या त्या यज्ञापासून ऋचा, सामवेदाचे मंत्र निर्माण झाले तसेच छंद व यजुर्वेदाचा उदय झाला.
तस्मादश्वा अजायन्त ये के चोभयादतः । गावो ह जज्ञिरे तस्मात्तस्माज्जाता अजावयः ॥१०।।
त्यातूनच अश्व निर्माण झाले. ज्यांना वरचे व खालचे असे दोन प्रकारचे दात (अथवा जबडा) असतो असे पशु उत्पन्न झाले. त्यातूनच गायी, शेळ्या, मेंढ्या, बोकड (अज ) निर्माण झाले.
यत्पुरुषं व्यदधुः कतिधा व्यकल्पयन् । मुखं किमस्य कौ बाहू का ऊरू पादा उच्येते ॥११।।
जेव्हा या पुरुषासाठी अवयवांची योजना केली तेव्हा कोणते अवयव कल्पिले? त्याचे मुख, बाहू, मांड्या, पाय कोणते ठरविण्यात आले.
ब्राह्मणोऽस्य मुखमासीद्बाहू राजन्यः कृतः । ऊरू तदस्य यद्वैश्यः पद्भ्यां शूद्रो अजायत ॥१२।।
तर ब्राम्हण हे मुख, राज्यकर्ते क्षत्रिय त्याचे बाहू, वैश्य त्याच्या मांड्या व शूद्र त्याचे पाय अशी योजना करण्यात आली.
(येथे चार वर्णांचा उल्लेख एकदाच ऋग्वेदात येतो).
चन्द्रमा मनसो जातश्चक्षोः सूर्यो अजायत । मुखादिन्द्रश्चाग्निश्च प्राणाद्वायुरजायत ॥१३।।
त्याच्या मनापासून चंद्र, दोन्ही नेत्रांच्या तेजापासून सूर्य, मुखापासून इंद्र व अग्नी आणि त्याच्या श्वासातून वायूची निर्मिती झाली.
नाभ्या आसीदन्तरिक्षं शीर्ष्णो द्यौः समवर्तत । पद्भ्यां भूमिर्दिशः श्रोत्रात्तथा लोकाँ अकल्पयन् ॥१४।।
त्याच्या नाभीपासून अंतरिक्ष, मस्तकापासून द्युलोक निर्माण झाला. त्याच्या पायांपासून भूमी, कानांपासून दिशा आणि इतर लोक उत्पन्न झाले. अशा प्रकारे संपूर्ण जगताची उत्पत्ती झाली.
सप्तास्यासन्परिधयस्त्रिः सप्त समिधः कृताः । देवा यद्यज्ञं तन्वाना अबध्नन्पुरुषं पशुम् ॥१५।।
या यज्ञाच्या सात परिधी (यज्ञवेदीच्या पायऱ्या) व त्रिसप्त (२१) समिधा केल्या होत्या. आणि देवांनी यज्ञाला प्रारंभ करून या यज्ञवेदीजवळ (यूपाला ) यज्ञ पशु म्हणून या विराट पुरुषाला बांधले.
यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् । ते ह नाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः ॥१६।।
अशा रीतीने यज्ञ योग्य पुरुषाद्वारे देवांनी यज्ञाद्वारे यजन केले आणि त्यातून निर्माण झालेल्या धर्माची प्रथम स्थापना केली व यज्ञमार्ग चालू केला, जेणेकरून स्वर्गाची प्राप्ती झाली.
१६ ऋचांचे हे सूक्त परमेश्वराच्या विराट रूपाचे वर्णन करते तसेच ते सृष्टिनिर्मितीची वेदकालीन मानली जाणारी प्रक्रियादेखील उद्धृत करते. सृष्टिनिर्मितीचे कोडे सोडविण्याचा प्रयत्न करणारी जी काही सूक्ते वेद वाङ्मयात आहेत त्यामधील हा देखील एक प्रयत्न आहे. सांख्यांचे तत्त्वज्ञान देखील याच पायावर उभे आहे. तत्कालीन ज्ञात असलेल्या ज्ञानातून परम ईश सामंजवून घेण्याचा तसेच सृष्टीचे कोडे उलगडण्याचा हा एक प्रयत्न आहे. पंचमहाभूतांची निर्मिती कशी झाली असावी ? प्राणी कसे निर्माण झाले असावेत, वेद कसे निर्माण झाले असावेत ? सूर्य - चंद्र - श्वासासाठी आवश्यक असलेला वायू यांची निर्मिती कशी झाली आणि धर्माचा पाया घालून स्वर्गाचा मार्ग कसा प्रशस्त केला गेला असेल याची कल्पना या सूक्तांतून येते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा