शुक्रवार, ४ फेब्रुवारी, २०२२

महाभारतातील स्त्रिया भाग - १ - डॉ. आ. ह. साळुंखे

 प्रकाशक - सुगावा प्रकाशन, पुणे ३० .....  प्रथमावृत्ती - १९९३, चौथी आवृत्ती - २००६


महाभारत कथेत स्त्रियांना अनन्यसाधारण महत्व आहे. किंबहुना महाभारताचे कथानक घडते त्याच्या अनेक कारणांपैकी  एक मुळी द्रौपदीच्या अपमानाचा सूड हे आहे. पण त्याच बरोबर या स्त्रियांना स्वतःचे तेज , ठोस विचारसरणी , ओजस्विता आहे, व त्यामुळे महाभारतातील काही स्त्रियांची रेखाटने उठून दिसतात. 


महाभारतातील उपाख्यानांमध्येही काही जनमानसात रूढ झालेल्या तर काही तुलनेने अप्रसिद्ध कथानकांद्वारे आपल्याला विविध स्त्रियांची ओळख होते. डॉ. आ. ह. साळुंखे यांनी “महाभारतातील स्त्रिया - भाग १” या पुस्तकातून यातील काही निवडक स्त्रियांची ओळख आपल्याला करून दिली आहे. पण हि ओळख केवळ त्या स्त्रीच्या स्वभावाची अथवा महाभारतातील स्त्रीच्या संदर्भातील नसून तत्कालीन समाज जीवनाचे प्रतिबिंब या शब्दचित्रामधून रेखाटले आहे.  महाभारतात येणारी एखादी कथा काय आशय दर्शविते व त्यातून स्त्री चे अथवा समाजमनाचे कोणते रूप आपण लक्षात घ्यावे याचे उत्तम विश्लेषण डॉ साळुंखे करतात. 


प्रास्ताविकात तुलसीविवाह प्रथा जालंधर या असुराची पत्नी वृंदा एक श्रेष्ठ पतिव्रता होती. जालंधरच्या वधासाठी विष्णूला प्रथम वृंदेच्या पातिव्रत्यभंग करणे आवश्यक ठरते यासाठी तो जालंधराचे रूप घेऊन वृंदेला फसवितो. मग वृंदा - विष्णू हि तुलसीविवाहाची प्रथा कशी चुकीची आहे हे डॉ साळुंखे आपल्याला पटवून देतात व यातूनच आपल्याला या पुस्तकात काय वाचायला मिळेल याची चुणूक दिसते. यात पुढे मग आपल्याला सावित्री, माधवी, शकुंतला, अंबा, द्रौपदी आणि भंगाश्वन राजाचे स्त्रीत्व या कथांमागील वेगळाच पैलू उलगडतो. 


सावित्रीची कथा तशी आपल्या सर्वांच्याच परिचयाची आहे. वटसावित्रीच्या व्रताच्या निमित्ताने ती समाजमनावर देखील रुजविली गेली आहे. पण डॉ आ ह साळुंखे मूळ महाभारतातील उपाख्यानाचे बारकावे सांगत आपल्याला वेगळा विचार करायला भाग पाडतात. राजकन्या असलेल्या सुंदर सावित्रीचा विवाह का होत नसावा ? तिला स्वतःलाच वर संशोधनासाठी का बाहेर पडावे लागले असेल ? त्यातही तिने निवडलेला वर जंगलात वास्तव्यास असणारा परागंदा झालेल्या राजाचा राजपुत्रच का असावा ? वनात राहणाऱ्या अल्पायुषी असा शाप असणाऱ्या सत्यवानाशीच तिची लग्नगाठ अशी का बांधलेली असावी याची कारणमिमांसा या कथेतीलच काही मुद्द्यांद्वारे डॉ साळुंखे आपल्यासमोर मांडतात. सत्यवानाचे अल्पजीवीत्व का असावे ? यामधर्माकडून आपली पतीचे प्राण परत मिळविणारी सावित्री आपल्या पित्यालाही १०० पुत्र व्हावेत असा वर का बरे मागून घेत असावी याचे विवेचन डॉ साळुंखे करतात. 


यानंतर ययातिकन्या माधवीची विलक्षण कथा आहे. हट्टीपणा कसा घटक ठरू शकतो हे दुर्योधनाला पटविण्यासाठी उद्योगपर्वात (अ. १०४ ते १२१) हे उपाख्यान येते. विश्वामित्राला गुरुदक्षिणा देण्यासाठी आवश्यकी असणारे ८०० श्यामकर्णी अश्व मागण्यासाठी गालव मुनी ययाती राजाकडे येतात. पण आता आपण पूर्वीप्रमाणे श्रीमंत राहिलेलो नाही त्यामुळे इतके अश्व देऊ शकत नाही, त्या ऐवजी मी माझी कन्या माधवी तुम्हाला देतो, एखाद्या राजाला तिला देऊन तुम्ही ते ८०० अश्व प्राप्त करा असे ययाती गालवांना सांगतो. पुढे प्रत्येकी २०० अश्वांच्या मोबदल्यात ३ राजांशी या माधवीच्या १ वर्षाच्या करारावर विवाह लावत गालव मुनी ६०० अश्व प्राप्त करतात पण ठाहून जास्त अश्व न मिळाल्याने माधवीला घेऊन ते विश्वामित्रांकडे जातात. त्यावर हिला आधीच माझ्याकडे आणले असतेस तर ८०० अश्वांची आवश्यकता नव्हती असे प्रतिपादन विश्वामित्र करतात. तत्कालीन समाजव्यवस्थेतील स्त्रीच्या स्थानाचे, अवस्थेचे विवरण यावर डॉ साळुंखे करतात. 


सुप्रसिद्ध कण्वकन्या शकुंतलेची कथाही काहीशी याच धाटणीची. मात्र शंतनू राजाने आपल्या पुत्रासह आपला स्वीकार केलाच पाहिजे हे ठणकावणारी  शकुंतला डॉ साळुंखे व्यवस्थित उभी करतात व शंतनूची बाजू लंगडी पडू नये यासाठी याकरिता नंतर पुराणकारांनी महाभारतात त्याच्या शापामुळे झालेली विस्मृतीची कथा घुसविले आहे. यात मग कोळ्याला सापडलेल्या आगनाथाची कथा येते. मूळ महाभारतात मात्र या कथेला स्थान नाही. मूळ शकुंतलाच कणखर आहे. 


अंबा  व द्रौपदी या महाभारतातील मूळ कथेतील नायिका. यातले अंबेचे भीष्मांविषयक सुडाचे प्रयोजन शिखंडीला कथेत जोडण्यासाठी कसे केले गेले हे आंबा प्रकरणात डॉ साळुंखे आपल्याला समजावतात. 


द्रौपदी कथेवरही लेखक असा वेगळा प्रकाश टाकतात. ज्या अर्जुनाने तिला पणात जिंकली त्याच्याच वाट्याला ती सर्वात कमी आली. अर्जुनाला १२ वर्षे तिचा विरह सहन करावा लागला. असे असून देखील तिने अर्जुनाच्या वाजून इंटर्नशी पक्षपात केल्यामुळेच तिला सर्वप्रथम मृत्यू आला असे युधिष्ठीर म्हणतो. पांचालीचा पाचांशी विवाह हा पांडवांच्या तिच्याविषयीच्या लालसेतून झाला. पुढे तो त्यांच्या एकीसही कारणीभूत ठरला हे खरं असलं तरी त्याची वैधता पटविण्यासाठी महाभारतकारानी बऱ्याच कसरती केल्या आहेत. 


यातील शेवटची कथा विलक्षण आहे व ती आहे एकाच जन्मी प्रथम पुरुष व नंतर स्त्रीरूप पावलेल्या भंगाश्वन नावाच्या राजाची. तत्कालीन समाजाच्या मानसशास्त्र व समाजशास्त्र यांचा वेध घेणारी हि  कथा महाभारताच्या अनुशासन पर्वात येते. या कथेच्या अनुषंगाने आपल्याला महाभारतकारांच्या अचाट कल्पनाशक्तीची कल्पना येते तर याच कथेला उजेडात आणत डॉ साळुंखेंनी स्त्रीत्व कसं श्रेष्ठ याचा विचार करायला लावला आहे. 


महाभारतकालीन स्त्रीत्वाचा वेध घेणारे डॉ आ ह साळुंखे यांचे हे पहिले पुस्तक प्रत्येक जिज्ञासूने वाचायलाच हवे असे आहे.


मंगळवार, २५ जानेवारी, २०२२

महाभारत, एक मुक्त चिंतन - प्रेमा कंटक

 प्रकाशक - महाराष्ट्र ग्रंथ भांडार , कोल्हापूर .....  प्रथमावृत्ती - १९६७ 

महाभारतातील विविध प्रसंगाचे विवेचन , त्याची चिकित्सा व त्यामागील शक्याशक्यता इत्यादींचे विवेचन सुमारे ५५ - ६० वर्षांपूर्वी महाभारताची भांडारकरप्रणित चिकित्सक  प्रत उपलब्ध झाल्यावर अनेकांनी केले आहे. यातील बरेच साहित्य त्या काळात पुस्तक रूपात उपलब्ध होत होते. पण हि पुस्तके आता दुर्मिळ या सदरात गणली जाऊ लागली आहेत. लेखिका प्रेमा कंटक यांचे महाभारत - एक मुक्त चिंतन , हे देखील याच दुर्मिळ प्रकारातील एक वेगळे पुस्तक. महाभारताचे वेगळ्या अंगानी चिंतन करत परामर्श घेणारे. तत्कालीन इतरांनी लक्षात न घेतलेले दुवे, संकल्पना मांडणारे व त्याचे वर्गीकरण करत महाभारताची कथा उलगडून दाखविणारे. या पुस्तकाला विनोबाजींनी प्रस्तावना देखील आहे. 

पुस्तकाची विभागणी ५ मुख्य प्रकरणांमध्ये केली आहे. हि ५ प्रकरणे महाभारताला वेगळ्या अंगाने स्पर्श करतात. यातील “कवी आणि ग्रंथ” या प्रकरणात नावाप्रमाणेच या महाकाव्याच्या स्वरूपाचा उहापोह आहे. महाभारताच्या रचनेत कुणाकुणाच्या कसकसा हातभार लागला, व्यासांपासून हा वारसा पुढे कसा सरकत गेला, त्यात उपाख्यानाची भर कशी पडत गेली याचे विवेचन आहे. 

 पुढचं प्रकरण आहे “विसंगती आणि असंभव”, यात महाभारतात आढळणाऱ्या पुनरुक्ति , अतिशयोक्ति , प्रक्षिप्तता याबद्दलची चर्चा आहे. याबद्दलची विविध उदाहरणे देताना लेखिकेने महाभारतातील अनेक विसंगती दाखविण्याचा प्रयत्न केला  आहे. याचबरोबर हे चमत्कार कसे प्रक्षिप्त असू शकतात यावर भाष्य केले आहे. उदा. चेदिराज शिशुपालाची जन्मकथा व त्याला असणारे जास्तीचे २ हात कृष्ण बलरामांच्या  दर्शनानंतर आपोआप गाळून पडल्याचा उल्लेख. यावेळी जर कृष्ण लहानग्या शिशुपालाला मांडीवर घेण्याएवढा मोठं होता तर रुक्मिणीस्वयंवरात तो त्याचा प्रतिस्पर्धी कसा ठरेल ? त्यामुळे शिशुपालाचे अपराध पोटात घालण्याचे वचन जर कृष्णाने आपल्या आत्याला दिलेच असेल तर ते इतर कोणत्या तरी प्रसंगी दोघेही व्यवस्थित मोठे ( व समवयस्क ) असताना दिले असले पाहिजे. 

अशीच एक विसंगती द्रोणाचार्यांच्या वयाबद्दलही आहे. द्रोणांचा वाढ झाल्यावरीलच्या वर्णनात 

“आकर्ण पलित: श्यामीवयसाशीती पंचक: ।।६०।।"

म्हणजेच ..... आचार्यांच्या शरीराचा वर्ण सावळा होता. कानापर्यंत त्यांचे केस शुभ्र झाले होते. वय ४०० (अशीती पंचक = ऐशीं पंचके = ४००) होते. 

महाभारतातील इतर योद्ध्यांच्या वयाच्या अंदाजांशी (अगदी भीष्मांच्याही ) हे विसंगत ठरते. 

यापुढील २ प्रकाराने विस्तृत आहेत. यातील “दैव कि पुरुषार्थ” या प्रकरणात महाभारत कथा सारांशाने येते व विविध प्रसंगांतील बारकावे उलगडले जातात. महाभारत कथेवरील मुख्य टिपणे या प्रकरणात आहेत. प्रत्येक घटनेमागचे विश्लेषण व लेखिकेची मतेदेखील आहेत.  हे प्रकरण सुमारे ७८ पानांचे आहे. 

यानंतरचे "सूत्रधार" हे सुमारे ८६ पृष्ठांचे प्रकरण संपूर्णपणे कृष्णाला वाहिलेले आहे. त्याचे बालपण विविध पुराणातून येते  पण त्यानंतर महाभारतातील कृष्ण उलगडला आहे. महाभारतातील त्याचे विशेष स्थान , त्याने विविध प्रसंगी घेतातलेले निर्णय , त्याचे पांडव, कुंती, द्रौपदी, विदुर यांच्याशी असणारे संबंध कधी व का जुळून आले असावेत याचा विचार.  कृष्ण द्रौपदी नात्यातील खरेपणा व त्यावर रचली गेली नंतरच्या काळातील नाट्यमय वर्णने, याचबरोबर विविध प्रसंगातील कृष्णाचा धोरणीपणा लेखिकेने वर्णिला आहे. कृष्णाची वैगुण्ये जशी लेखिका आपल्याला दाखवते तसेच  काही प्रसंगती त्याचा अतिविशेष मुत्सद्दीपणा देखील. उदा. युधिष्ठीर व अर्जुनातील कर्णवधावरून रंगलेले भांडण व कृष्णाने समाधानपूर्वक केलेले दोघांचेही सांत्वन त्याचा मुत्सद्दीपणा व समयसूचकता दर्शवितो. 

कृष्णाने पांडवांची जबाबदारी आपल्या शिरावर घेतली होती व ती शेवटपर्यंत निभावली. अगदी युद्ध संपल्यावर देखील. अशा या असामान्य व्यक्तीचा अंत मात्र एखाद्या सामान्य व्यक्तीप्रमाणेच झाला याचेही वर्णन या भागात येते. 

शेवटचे प्रकरण “असक्तबुद्धी: सर्वत्र”. हे प्रकरण म्हणजे ग्रंथ व धर्म या बद्दलची चर्चा आहे. महाभारत, वेद , पुराणे यातील धर्माचे स्वरूप आणि धर्मशास्त्राचा विकास कसा झाला याचे विवेचन लेखिकेने यात केले आहे. 

एकंदरीतच महाभारतावर वेगळा प्रकाश टाकणारे हे पुस्तक  सध्या सहज उपलब्ध नाही. पुणे नगर वाचनालयात उपलब्ध असलेली एक प्रत माझे मित्र श्री संजय संती, यांनी मला वाचनासाठी उपलब्ध करून दिली यासाठी मी त्यांचा आभारी आहे. महाभारताच्या जिज्ञासू वाचकाला ते नक्कीच आवडेल. 


गुरुवार, ६ मे, २०२१

या सम हा - डॉ.सदानंद मोरे

 योगेश्वर कृष्णाचे वैचारिक चरित्र, 

डॉ सदानंद मोरे हे पुणे विद्यापीठातील तत्वज्ञानाचे प्राध्यापक व भारतीय संस्कृती आणि इतिहास हा त्यांचा अभ्यासाचा विषय. तो हाताळतानाच त्यांचा संबंध महाभारताबरोबरच भगवतगीता व कृष्णचरित्र असलेल्या पुराणांशी आला.त्यातही त्यांना वेगवेगळ्या प्रकारचा कृष्ण आढळला व त्यांचाही कृष्णचरित्राचा एक वेगळा शोध सुरु झाला आणि तो होता विचारवंत व तत्वज्ञानी  कृष्णाचा. याचीच परिणती एका शोधनिबंधात झाली तो म्हणजे Krishna : The Man and His Mission. हाच शोधनिबंध श्रीमती पूर्णिमा लिखिते यांनी “या सम हा” या नावाने मराठीत पुस्तकरूपाने आणला आहे. 

या शोधनिबंधाचे स्वरूप अर्थातच कृष्णाकडे ईश्वरी अवतार म्हणून न पाहता इहलोकातील मानव म्हणून पाहिले तर कसे दिसेल हे आहे. यात कृष्णचरित्राचे तत्वज्ञान ठासून भरले आहे. शोधनिबंध असल्याने सुरवातीचे प्रकरण नेमकी समस्या (अथवा शोधनिबंधकारासमोरील प्रश्न) व पद्धत (प्रश्नाचं अथवा समस्येचं निराकरण करण्याची) याचा उहापोह आहे. यासाठी त्यांनी पाश्चात्य तसेच भारतीय पूर्वसुरींच्या अभ्यासाचा आढावा घेतला असून देवावताराचे प्रारूप आपल्यासाठी केवळ निरुपयोगीच नाही तर कसे धोकादायक ठरू शकेल ते दाखविले आहे. यानंतर यात बंगालचा चैतन्य संप्रदाय व महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय या कृष्णभक्त संप्रदायांची तुलना आहे. या संप्रदायांची साहित्यनिर्मिती व त्यांचा परंपरांवरील ठसा यांचा आढावाही आहे. 

“कृष्णाच्या कर्तृत्वाची रूपरेषा” या प्रकरणामध्ये कृष्ण चरित्रातील ठळक गोष्टी येतात व त्यांचे विश्लेषण देखील येते.  कृष्णाचा कंस वध, त्याचे नातेसंबंध, विवाहसंबंध, महत्त्वाच्या घटना व त्यात त्याची भूमिका, एकलव्या बद्दलची माहिती, अक्रूर स्वभावाचे बारकावे दर्शविणारी स्यमंतक मण्याची कथा, वासुदेवत्वाचा प्रश्न, इत्यादी अनेक मुद्द्यांना डॉक्टर मोरे स्पर्श करतात व त्यामागची प्रेरणा, तत्वज्ञान, विचारसरणी समजावून सांगतात.  

यात आपल्याला गणराज्य व राजसत्ता यातील संघर्षाची बीजे सापडतात व यादव संघात माजलेली दुफळी कळते. त्यातून कृष्ण या लोकनेत्याचा उदय कसा झाला असावा हे आपल्या लक्षात येते. हे राजकीय प्रश्न सोडवताना कृष्णाची प्रगल्भता बहरत जाते व त्याचे सामाजिक स्थान, नेतृत्वगुण, हे देखील उभारून वर येतात.  कृष्णाचे विवाह,  त्यामागचे हेतू , आपल्याला स्पष्ट होत जातात.  कृष्णशिष्टाईच्या वेळचे योगेश्वर दर्शन म्हणजे त्याच्या मुत्सद्देगिरीचा परमोच्च बिंदू.  ज्याने युद्धाचा सर्व दोष कौरवांच्या पारड्यात टाकण्यात व सहानुभूतीचे जनमत पांडवांच्या बाजूने वळविण्यात कृष्ण कमालीचा यशस्वी ठरला. 

या पुस्तकाचे स्वरूप कृष्णाचे तत्त्वज्ञान समजून घेण्याचे असल्यामुळे दैव व पुरुषकार,  कर्मांचे समर्थन - गरज आणि आवश्यकता,  अर्जुनाचा प्रश्न,  धर्म रहस्य,  नीती-प्राधान्य वाद,  इत्यादी विविध प्रकरणातून कृष्णाच्या तात्विक बैठकीचे पैलू डॉक्टर मोरे यांनी व्यवस्थित उलगडले आहेत. यातील योग व धर्म यांचे विवेचन तर केवळ अप्रतिम आहे.  

असे असले तरी पुस्तक वाचायला व समजून घ्यायला बरेच अवजड असल्याने कृष्ण अथवा महाभारताच्या सर्वसामान्य वाचकाला ते सहज पचनी पडायला कठीण जाते.  पण हे पुस्तक म्हणजे एक शोधनिबंध आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.  त्या दृष्टीने आपल्याला त्याचे वेगळेपण आणि महत्त्व लक्षात येईल.