गुरुवार, ६ मे, २०२१

या सम हा - डॉ.सदानंद मोरे

 योगेश्वर कृष्णाचे वैचारिक चरित्र, 

डॉ सदानंद मोरे हे पुणे विद्यापीठातील तत्वज्ञानाचे प्राध्यापक व भारतीय संस्कृती आणि इतिहास हा त्यांचा अभ्यासाचा विषय. तो हाताळतानाच त्यांचा संबंध महाभारताबरोबरच भगवतगीता व कृष्णचरित्र असलेल्या पुराणांशी आला.त्यातही त्यांना वेगवेगळ्या प्रकारचा कृष्ण आढळला व त्यांचाही कृष्णचरित्राचा एक वेगळा शोध सुरु झाला आणि तो होता विचारवंत व तत्वज्ञानी  कृष्णाचा. याचीच परिणती एका शोधनिबंधात झाली तो म्हणजे Krishna : The Man and His Mission. हाच शोधनिबंध श्रीमती पूर्णिमा लिखिते यांनी “या सम हा” या नावाने मराठीत पुस्तकरूपाने आणला आहे. 

या शोधनिबंधाचे स्वरूप अर्थातच कृष्णाकडे ईश्वरी अवतार म्हणून न पाहता इहलोकातील मानव म्हणून पाहिले तर कसे दिसेल हे आहे. यात कृष्णचरित्राचे तत्वज्ञान ठासून भरले आहे. शोधनिबंध असल्याने सुरवातीचे प्रकरण नेमकी समस्या (अथवा शोधनिबंधकारासमोरील प्रश्न) व पद्धत (प्रश्नाचं अथवा समस्येचं निराकरण करण्याची) याचा उहापोह आहे. यासाठी त्यांनी पाश्चात्य तसेच भारतीय पूर्वसुरींच्या अभ्यासाचा आढावा घेतला असून देवावताराचे प्रारूप आपल्यासाठी केवळ निरुपयोगीच नाही तर कसे धोकादायक ठरू शकेल ते दाखविले आहे. यानंतर यात बंगालचा चैतन्य संप्रदाय व महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय या कृष्णभक्त संप्रदायांची तुलना आहे. या संप्रदायांची साहित्यनिर्मिती व त्यांचा परंपरांवरील ठसा यांचा आढावाही आहे. 

“कृष्णाच्या कर्तृत्वाची रूपरेषा” या प्रकरणामध्ये कृष्ण चरित्रातील ठळक गोष्टी येतात व त्यांचे विश्लेषण देखील येते.  कृष्णाचा कंस वध, त्याचे नातेसंबंध, विवाहसंबंध, महत्त्वाच्या घटना व त्यात त्याची भूमिका, एकलव्या बद्दलची माहिती, अक्रूर स्वभावाचे बारकावे दर्शविणारी स्यमंतक मण्याची कथा, वासुदेवत्वाचा प्रश्न, इत्यादी अनेक मुद्द्यांना डॉक्टर मोरे स्पर्श करतात व त्यामागची प्रेरणा, तत्वज्ञान, विचारसरणी समजावून सांगतात.  

यात आपल्याला गणराज्य व राजसत्ता यातील संघर्षाची बीजे सापडतात व यादव संघात माजलेली दुफळी कळते. त्यातून कृष्ण या लोकनेत्याचा उदय कसा झाला असावा हे आपल्या लक्षात येते. हे राजकीय प्रश्न सोडवताना कृष्णाची प्रगल्भता बहरत जाते व त्याचे सामाजिक स्थान, नेतृत्वगुण, हे देखील उभारून वर येतात.  कृष्णाचे विवाह,  त्यामागचे हेतू , आपल्याला स्पष्ट होत जातात.  कृष्णशिष्टाईच्या वेळचे योगेश्वर दर्शन म्हणजे त्याच्या मुत्सद्देगिरीचा परमोच्च बिंदू.  ज्याने युद्धाचा सर्व दोष कौरवांच्या पारड्यात टाकण्यात व सहानुभूतीचे जनमत पांडवांच्या बाजूने वळविण्यात कृष्ण कमालीचा यशस्वी ठरला. 

या पुस्तकाचे स्वरूप कृष्णाचे तत्त्वज्ञान समजून घेण्याचे असल्यामुळे दैव व पुरुषकार,  कर्मांचे समर्थन - गरज आणि आवश्यकता,  अर्जुनाचा प्रश्न,  धर्म रहस्य,  नीती-प्राधान्य वाद,  इत्यादी विविध प्रकरणातून कृष्णाच्या तात्विक बैठकीचे पैलू डॉक्टर मोरे यांनी व्यवस्थित उलगडले आहेत. यातील योग व धर्म यांचे विवेचन तर केवळ अप्रतिम आहे.  

असे असले तरी पुस्तक वाचायला व समजून घ्यायला बरेच अवजड असल्याने कृष्ण अथवा महाभारताच्या सर्वसामान्य वाचकाला ते सहज पचनी पडायला कठीण जाते.  पण हे पुस्तक म्हणजे एक शोधनिबंध आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.  त्या दृष्टीने आपल्याला त्याचे वेगळेपण आणि महत्त्व लक्षात येईल. 


गुरुवार, २९ एप्रिल, २०२१

धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे - विश्वास दांडेकर

 प्रथमावृत्ती - डिसेंबर २००६, दुसरी आवृत्ती - २०१४.

मला कृष्ण कुठे सापडेल? हा मला बरेच दिवस पडलेला प्रश्न होता.  खराखुरा कृष्ण, देवपणाची पुटे  न चढलेला कृष्ण, राजकारण धुरंधर कृष्ण, महाभारतातील पांडव सखा, अर्जुनाचा सखा. असा कृष्ण मला तुकड्या-तुकड्यामध्ये व्यासांचे शिल्प, युगांत, व्यासपर्व मध्ये सापडत होता, पण त्यात हवी तशी सलगता नव्हती.  "युगंधर" मधला भगवान श्रीकृष्ण सुखावणारा असला तरी सर्वस्वी पटणारा नव्हता.  त्यामुळेच ज्या कृष्णाला मी शोधत होतो तो थोड्याफार प्रमाणात मला सापडला तो श्री विश्वास दांडेकर यांच्या धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे मध्ये. 

महाभारताच्या कथानकावर बेतलेले हे पुस्तक आपल्याला महाभारताला स्पर्श करत कृष्णचरित्र उलगडताना आढळते.  कृष्ण जन्मापूर्वीची गोकुळ व मथुरेतील यादवांची स्थिती,  गणराज्य व राजेशाही यातील सूक्ष्म फरक, आणि त्याच्या पार्श्वभूमीवर कंस जरासंध द्वयीच्या राजेशाहीची स्थापना, याने या पुस्तकाची सुरुवात होते.  आणि आपल्याला कृष्णजन्म व त्यानंतर काय काय व कसे कसे घडले याची माहिती देते.  मग अशाच प्रकारे आपल्या पुढे येतो तो कुरु वंशाचा संक्षिप्त इतिहास आणि त्यांच्यातील दुहीच्या बीजांची कारणे.  छोट्या-मोठ्या घटनांचा उल्लेख करत पण त्यातील वर्णने टाळत आपल्याला मग पांडव व कृष्ण कसे व का एकत्र आले हे अगदी सहजपणे उकलते. 

त्यानंतरच्या घटना या कृष्णाच्या पांडवांबरोबरच मैत्री नंतरच्या आहेत.  ज्या सुरू होतात द्रौपदीस्वयंवराबरोबर जेथे कृष्ण प्रथम महाभारतात येतो.  त्याआधीच्या घटना हरिवंश अथवा भागवत पुराणातून आपल्या समोर येतात.  कृष्ण पांडवांबरोबर आल्यानंतर राज्य वाटणी, खांडववन दहन, इंद्रप्रस्था ची स्थापना, जरासंध वध, राजसूय यज्ञ व यावेळी कृष्णाने केलेला शिशुपालवध या सार्‍या घटनांची कारणमीमांसा आपल्याला सहज उलगडत जाते. 

मग येतो द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग दोन विस्तृत प्रकरणातून आपल्याला या प्रसंगाच्या वेळी ते द्यूत  का व कसे घडले असावे? आणि वस्त्रहरण हि घटना प्रत्यक्षात का घडलेली नसावी ? हे समजावून दिले आहे. यात द्यूत, अक्षविद्या आणि त्यासाठी आवश्यक असणारे कौशल्य, या सार्‍यांची फोड आहे व तसेच वस्त्रहरण प्रसंगात पर्यंतच्या व नंतरच्या घटना उकलून दाखविलेल्या  आहेत 

यानंतरचा कृष्ण येतो तो शिष्टाई प्रसंगीचा. या प्रसंगात श्रीकृष्णाच्या कौशल्याची कसोटी लागते व त्यात तो स्वतःच्या संरक्षणाची संपूर्ण व्यवस्था स्वतःच  करत, दुर्योधन, दुशासन, कर्ण व शकुनी या चौकडीचा धुव्वा उडवत, युद्धाचा सर्व दोष कौरवांवर टाकत,  आपल्या मनाप्रमाणे युद्ध ठरवतो व कृष्णशिष्टाई फिस्कटली, असे दाखवत नंतर कर्णाला  त्याचं जन्म रहस्य उघड करत, त्यावर मानसिक आघात देखील करतो

याच पुस्तकाच्या परिशिष्टामध्ये या साऱ्या घटनांची सांस्कृतिक पार्श्वभूमी व संदर्भ आहेत जे या पुस्तकाला परिपूर्ण करतात.  व म्हणूनच तुम्हाला जर महाभारत कथेची जाण असेल व महाभारतातल्या कृष्णाचा परिचय करून घ्यायचा असेल तर हे पुस्तक वाचायलाच हवे.  अर्थातच या एकाच पुस्तकात सामावण्या एवढा कृष्ण लहान नाही.  त्याला आणखी शोधायचा असेल तर तो हरीवंश, भागवत पुराण,बाळशास्त्री हरदास यांची व्याख्याने, अशा विविध ठिकाणी शोधायला हवा तेव्हा त्याचे विखुरलेले वेगवेगळे अंश सापडतील. 


शुक्रवार, २३ एप्रिल, २०२१

महाभारत एक सूडाचा प्रवास - दाजी पणशीकर

 प्रथमावृत्ती  १९७७ , नववी आवृत्ती - नोव्हेंबर २०१९


महाभारताच्या प्रत्येक अभ्यासकाला ते वेगवेगळे गवसलं.  कोणी त्यात व्यक्तिदर्शन शोधलं, तर कोणी त्यातील पात्रांच्या तोंडून संपूर्ण कथा कशी असेल ते वदविले. हे करताना त्यातून कृष्ण, कर्ण, दुर्योधन, अर्जुन यांसारखे अनेक महानायक पण तयार केले.  महाभारताचा विविध अंगाने अर्थ लावायचा प्रयत्न विविध लेखकांनी केला.  दाजी पणशीकर यांचा या पुस्तकातील प्रयत्न हा असाच एक “सूड” हि  वेगळी मध्यवर्ती संकल्पना उलगडण्याचा प्रयत्न होता व तो कमालीचा यशस्वी झालाय. 

१९७७ साली  प्रथम प्रसिद्ध झालेल्या महाभारत - एक सूडाचा प्रवास, या दाजी पणशीकर यांच्या पुस्तकाला नरहर कुरुंदकर यांची विस्तृत प्रस्तावना आहे.  हीच प्रस्तावना पुढे "व्यासांचे शिल्प" या नरहर कुरुंदकरांच्या लेखांचं / प्रस्तावनांचे संकलन असलेल्या पुस्तकात देखील संकलित केली आहे. 

महाभारत घडण्यास कारण ठरलेल्या क्रोधातून जन्मलेल्या सूड या संकल्पनेभोवती  या पुस्तकाचा विषय उलगडला जातो.  याची सुरुवात होते ते परशुरामांचा क्रोध व सूड  उलगडून.  आणि महाभारताची सुरुवात पणशीकर यांच्या मते होते ते अंबेच्या प्रतिशोधाच्या धुमसणाऱ्या आगीतून. काशीराजाच्या अंबा, अंबिका व अंबालिका या तीन कन्यांच्या स्वयंवरासाठी भीष्म पोहोचतात ते राजकुमार विचित्रविर्यासाठी.  आणि या पळवून आणलेल्या मुलींपैकी अंबा जेव्हा आपले शाल्व  राजावर प्रेम असल्याचे हस्तिनापुरात त्यांना सांगते, तेव्हा ते तिला सन्मानाने शाल्वाकडे परत देखील पाठवतात.  पण दुसऱ्याने पळवलेली मुलगी, म्हणून शाल्व तिला स्वीकारायला नकार देतो.  प्रतिज्ञाबद्ध भीष्मही  तिला स्वीकारत नाहीत आणि मग संतप्त अंबा याचा सूड म्हणून भीष्मांच्या विनाशासाठी विविध उपाय योजते.  अगदी परशुरामांना ही भरीस  घालते पण शेवटी तिचा निरुपाय होतो आणि ती अग्नीसमर्पण करते तेच भीष्मनाशासाठी पुनर्जन्म घेण्याच्या इच्छेने.  सुडाची ही साखळी व्यवस्थितपणे मांडण्यासाठी पणशीकरांनी या पुस्तकातील आठ प्रकरणे वापरली आहेत. 

द्रुपद व द्रोण यांच्यातील कटुतेचा उद्रेक हि सुडाची अजून एक साखळी.  द्रुपदाला बालमित्र म्हणून भेटायला गेलेल्या द्रोणाचा, राजा द्रुपद अपमान करतो, आणि द्रोण मग सूडाच्या भावनेने पेटून उठतात.  त्यांच्या पुढच्या सर्व क्रिया, त्यांचे कुरू दरबारात जाणे,  राजपुत्रांना शिकवणे, त्यांच्याकडून द्रुपदाला बंदी बनवून आणण्याची गुरुदक्षिणा मागणे, हे  सारे काही द्रुपदाचा सुड घेण्यासाठी.  आणि तो घेतला गेल्यावर द्रुपद सुडाने पेटून उठतो तो द्रोणांना संपविण्यासाठी  आणि मग दुसरे सूडचक्र सुरू करतो.  ते मग दृष्टद्युम्न,  द्रौपदी यांना जन्माला घालण्यापासून ते अंतिम युद्धात द्रोणाचा शिरच्छेद दृष्टद्युम्न करेपर्यंत संपतच नाही.  आणि यामध्येही अनेक लहान मोठी सूडचक्र सुरूच राहतात.  द्रौपदी स्वयंवर प्रसंगी कर्णाचा अपमान करते याचा प्रतिशोध कर्ण घेत राहतो, प्रत्येक वेळी तिला अपमानित करण्याची संधी शोधत.  दुर्योधनाला त्याची साथ मिळत जाते आणि त्यातून निर्माण होणारे  सूडचक्र तर सर्वांनाच गिळंकृत करते.  यातच मध्ये जन्मांधांच्या अंधारयात्रेचे चक्र आहे आणि डोळस गांधारीचे देखील. 

महाभारत युद्धाचा अंत देखील सूडचक्रामुळेच करुण झाला आहे.  आपल्या पित्याच्या हत्येने सूडाग्नी प्रज्वलित झालेला अश्वत्थामा, युद्ध संपल्यानंतर पांचालांच्या शिबिरात निद्रिस्त असलेल्या पांचाल सेनापती दृष्टद्युम्न, द्रौपदीची पाच मुले, शिखंडी इत्यादींची रात्री अमानुष हत्या करतो आणि या सूड  चक्राची पुढची पायरी गाठतो.  

अशा या संहार पर्वाचे वर्णन दाजी पणशीकरांनी व्यवस्थित उलगडून दाखवले आहे व ते देखील विविध श्लोकांचे प्रमाण देत, आणि त्यांचा अर्थ विशद करीत.  त्यामुळेच महाभारत कथानकातील बारीक-सारीक पैलू देखील एका वेगळ्या स्वरुपात आपल्या समोर उघड होतात. पणशीकरांचा महाभारताचा अभ्यास, त्यांचे त्यावरील चिंतन, आणि विषय समजावण्याची हातोटी केवळ अप्रतिम आहे व म्हणूनच महाभारताचे सूड हे अंग समजावून घ्यायचे असेल तर हे पुस्तक वाचणे आवश्यक ठरते. 


रविवार, १८ एप्रिल, २०२१

व्यासांचा वारसा - आनंद विनायक जातेगावकर

प्रथमावृत्ती - फेब्रुवारी २००९, तृतीय आवृत्ती - मे २०१६

व्यासांचा वारसा हे आनंद जातेगावकरांचे पुस्तक म्हणजे व्यासांचा, खरतर एक जादुई आरसाच आहे, ज्यात पाहून आपल्याला व्यास लख्खपणे दिसू लागतात.  ज्या गोष्टी महाभारतातून भांडारकर संस्थेच्या संशोधित प्रतीलाही वेगळ्या करता येऊ शकल्या नाहीत (कोणत्या ना कोणत्या तरी जुन्या हस्तलिखित प्रतींमध्ये असल्यामुळे) त्या  देखील या आरश्यात आपल्याला स्पष्टपणे ओळखता येऊ शकतात.  मात्र यासाठी हा आरसा पाहण्याचे कसब आत्मसात करणे, आपल्याला  आवश्यक आहे

जातेगावकऱ्रांचं एक निरीक्षण म्हणजे, स्वतः कथालेखक असलेले व्यास जे या कथेचा भाग आहेत, ते निर्वाणीच्या क्षणी या कथेत स्वतः हजर होतात, ते मोलाचा सल्ला देतात, सूचक बोलतात, मात्र कोणतीही भविष्यवाणी ते वर्तवित नाहीत.  ते दैववादी नाहीतच मुळी आणि यात कृष्ण सोडला,  तर इतर सर्व व्यक्तिरेखा मात्र,  दैववादाचा समर्थन करताना आढळतात व त्यातून वर, शाप, चमत्कार या संकल्पना उगम पावतात.  व्यास मात्र कोठेही यात  अडकत नाहीत.  जातेगावकर यातून हेदेखील सूचित करतात की,  या साऱ्या गोष्टी म्हणजे उत्तरकालीन भर.  व्यासांनी स्वतः कुठेही अशा प्रकारची वाक्ये टाकलेली नाहीत. 

महाभारतातील काही घटना प्रक्षेप कशा असतील हे आपल्याला जातेगावकर सुचवून जातात.  शरशय्येवर पडलेल्या भीष्मांनी,  युधिष्ठिराला केलेला उपदेश हा याच प्रकारातला.  राजाचं,  संसारी गृहस्थाचे वर्तन कसं असावं याबद्दल भीष्मांनी लावलेले पाल्हाळ पाहता हे अगदी पटते.  तीच गोष्ट वनपर्वातील सत्यभामा-द्रौपदी संवादाची.  उत्तरकालीन पुरुषी प्रवृत्तीला स्त्री वर्गाकडून / पत्नी वर्गाकडून, अपेक्षित असणाऱ्या साऱ्या गोष्टी द्रौपदी द्वारे वदविल्या गेल्या आहेत, हे पटवून देण्यात जोतेगावकर यशस्वी होतात. 

तीच गोष्ट युधिष्ठिर यक्ष संवादाची.  ब्राह्मणी वर्चस्वाला आवश्यक असणाऱ्या गोष्टी यक्ष युधिष्ठिर कडून वदवून घेतो व चक्क तळ्याकाठी मृत होऊन पडलेल्या पांडवांना जिवंत करतो.  भांडारकर संस्थेच्या श्री विष्णू सुखटणकर यांनी मांडलेल्या भृगू सिद्धांताचे हे आणखी एक उदाहरण. 

काही गोष्टींची उत्तरं जातेगावकर त्यांच्या प्रतीप्रश्नांनी आपल्या मनात तयार करतात.  भीष्म जिवंत असेपर्यंत शस्त्र हाती न धरण्याची करण्याची प्रतिज्ञा म्हणजे भीष्म मरणारच….  कौरवांचा पराभव होणारच….  याचे गृहीतक होते का?  “दर्जाने समान प्रतिस्पर्ध्यांशीच राजकुमार युद्ध करतात”  असे स्पर्धा प्रसंगी ठणकवणारे  कृपाचार्य, द्रौपदी वस्त्रहरण प्रसंगी गप्प का होते? सत्तेवरून कौरवांनी मध्ये ते शंभर असूनही दुही माजत नाही,  मात्र केवळ पाचच पांडवांना एकत्र ठेवायला एकाच द्रौपदीशी विवाह करावा लागतो, तो का ?  याच  द्रौपदीच्या विवाहाच्या वेळी व्यास येऊन द्रुपदाला, द्रौपदीच्या पूर्वजन्माची व शंकराच्या पाच पतीच्या वरांची गोष्ट का सांगतात? या सर्व गोष्टींचा उलगडा आपल्याला मनामध्ये होत राहतो. 

व्यास मात्र हे सर्व करून, कथानकात असून, स्वतः निर्विकार राहतात.  व्यासोत्तर काळात संपूर्ण संस्कृतीच कृष्णा च्या प्रेमात पडली व या अवतारवादाने महाभारतात हवी तशी भर घालून, त्याचं अगदी अंकोर वाटच्या मंदिरासारखं करून टाकले आहे.  त्याला जंगलानी  व वृक्षराजीने पूर्णपणे वेढून टाकले इतकं, की कधी कधी ते आतलं मंदिर ढळू नये म्हणून वाढलेल्या वृक्षांच्या शाखादेखील तोडता येत नाहीत, कारण तसं झालं तर, झाडांच्या मुळासह  मंदिराच्या ढाच्याला देखील धक्का लागू शकतो हि  जोतेगावकरांची हे समजावण्याची पद्धत पण अफलातून. 

पण हे असं असलं तरी हे पुस्तक वाचणं सोपं नाही.  महाभारतातले बरेचसे प्रसंग आरशात दाखवताना जातेगावकर गुढात  बोलतात.  अगदी या अंकोर वाटच्या मंदिरा सारख्या.  व म्हणूनच महाभारतातले बरेचसे प्रसंग यात सांगितले असले, तरी त्याचं मर्म समजायला आपल्याला ही गूढं सोडवावी लागतात व त्या पद्धतीत जातेगावकर व्यासांचा वारसा चालवीत आहेत असे मानता येते. 


गुरुवार, १५ एप्रिल, २०२१

हा जय नावाचा इतिहास आहे - आनंद साधले

 प्रथमावृत्ती - नोव्हेंबर १९६४ , चौथी आवृत्ती - ऑगस्ट २०१४

“युधिष्ठिराच्या पराभवाची गाथा” खरं तर हे या पुस्तकाचं नाव असायला हवं होतं असं हे पुस्तक वाचल्यानंतर वाटतं या पुस्तकात असं एकही पान नाही कि ज्यात  युधिष्ठीराला दूषणं दिलेली नाहीत.

पुस्तकाच्या नावावरून हे थोडक्यात वर्णिलेले महाभारत असावं असं मला वाटलं होतं.  प्रकरणांची नावे त्यांच्या संस्कृत श्लोकांची संक्षिप्त मराठी अर्थ आहे.  पण श्री आनंद साधले यांनी , वेचून वेचून युधिष्ठिराला नाव ठेवणारे श्लोक कसे निवडले असावेत?  याचं आश्चर्य वाटत राहतं.  श्रीकृष्णाचे मजबूत अधिष्ठान हे देखील या पुस्तकाचं आणखी एक वैशिष्ट्य.  पांडवांची वैगुण्य दाखवत ती श्रीकृष्णाने कशी झाकली,  हे दाखवत साधले यांनी श्रीकृष्णाचे गुणगान  केलं आहे.  आणि प्रत्येक प्रसंगात श्रीकृष्ण नसता तर काहीच कसं  होऊ शकलं नसतं,  हे दाखवत त्यांनी अर्जुना सह सर्व पांडव कसे प्रभावहीन ठरत हे रंगविले आहे. 

आणि हे करताना धृतराष्ट्र, दुर्योधन प्रभृतींचा त्रागा कसा समर्पक होता व त्यांचाच राज्यावर कसा प्रथम अधिकार ठरत होता हेदेखील त्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला आहे. यात कर्णावर वेळोवेळी झालेला अन्याय त्यांनी अधोरेखित करत कर्णाच्या पराभवांवर  व चुकांवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न देखील केला आहे. 

पण असे असले तरी १९६४ साली प्रसिद्ध झालेले त्यांचे हे पुस्तक महाभारताविषयी चा एक वेगळा व कदाचित विद्रोही दृष्टिकोण म्हणून अभ्यासायला हवे.  तसे झाले तरच  अभ्यासकांकडून त्यातील सत्याच्या खोलात जाण्याचे प्रयत्न होतील.  मात्र असे प्रयत्न न झाल्यास तो वाचक अभ्यासाच्या पातळीवर न जाता अगम्य महाभारतात हरवून जाईल. 

छोटी छोटी प्रकरणं, हे देखील या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे.  लेखक यातून तो तो प्रसंग रंगवत वाचकाच्या मनावर ठसवत जातो.  ही एक चांगली लेखन पद्धत आहे पण केवळ युधिष्ठिराची वैगुण्ये दाखवण्याच्या अट्टाहासापायी  हे वैशिष्ट्य वाया गेले असे वाटत राहते. 

शनिवार, १० एप्रिल, २०२१

व्यासांचे शिल्प, लेखक - नरहर कुरुंदकर

 (श्री विनोद थोरात यांच्या फेसबुक वॉल वरून साभार घेऊन संक्षिप्त केलेला पुस्तकअभिप्राय)

महाभारताचा अभ्यास विविध प्रकारे करता येतो. काही लोक संस्कृतीची परिवर्तने शोधण्यासाठी, काही लोक संस्कृतीची रूपे आणि विविधता शोधण्यासाठी तर काही लोक धर्मश्रद्धा म्हणून महाभारत वाचतात. 'व्यासांचे शिल्प' या पुस्तकात कुरुंदकरांनी महाभारताचा अभ्यास ऐतिहासिक दृष्टीने केलेला आहे.

महाभारतामध्ये प्रत्येक शतकात काहीना काही भर पडत गेली आहे. महाराष्ट्रामध्ये प्रचलित आणि लोकप्रिय असणारी महाभारताची प्रत म्हणजे 'नीलकंठी प्रत'. परंतु ही काही मूळ महाभारताची प्रत नाही याची सर्वांना जाणीव होती. निळकंठी प्रतीच्या जास्तीत जास्त मागे जाण्याचे उद्देशाने पुणे येथील भांडारकर प्राच्यविद्या संस्थेमार्फत कै डॉ सुखटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली १९२७ साली विद्वानांनी कार्य करण्यास सुरुवात केली. ही आवृत्ती तयार करण्यासाठी तेलुगू मधील आंध्र महाभारत, जावा येथील महाभारत, काश्मीर मधील शारदा प्रत, महाभारतावरील सर्वात जुनी टीका लिहिणारा देवबोध, महाभारत सारांश सांगणारा क्षेमेंद्र  याची 'भारतमंजिरी' अशा अनेक प्रतींचा अभ्यास करण्यात आला. शेवटी १९६६ साली महाभारताची चिकित्सक आवृत्ती तयार झाली. याला 'भांडारकर प्रत' असे म्हणतात. कुरुंदकर ही चिकित्सक आवृत्ती इस १००० च्या सुमाराची मानतात.

कुरुंदकर म्हणतात, महाभारत हा सातत्याने प्रक्षेप होत जाणारा ग्रंथ आहे. तसेच त्याचे अनेकदा पुनर्लेखनही झाले आहे. कोण एके काळी हा ग्रंथ भृगू ऋषी कुळाच्या हातात पडला आणि भृगुंनी आपल्या परंपरागत कथा महाभारतात बसवून दिलेल्या आहेत. गुप्तकाळात आणि त्यानंतरच्या काळातही महाभारतात फार मोठी भर पडलेली दिसते. चिकित्सक आवृत्तीच्या सहाय्याने गणपतीने महाभारत लिहिणे, द्रौपदीची अक्षय थाळी, दुर्वास ऋषीनी घेतलेली पांडवांची परीक्षा, द्रौपदी स्वयंवरातील कर्णाची भूमिका या सर्व आणि अशा अनेक गोष्टी मूळ महाभारतामध्ये नसून नंतर कोणीतरी घुसवण्यात आल्याचे कुरुंदकर सांगतात.  

दाजी पणशीकर यांनी लिहिलेले 'महाभारत - एक सूडाचा प्रवास', नारायण गोविंद नांदापूरकर यांनी व्यासांचे मूळ महाभारत, मुक्तेश्वर यांचे त्यावरील काव्य आणि मोरोपंतांचे 'आर्याभारत' या तीन ग्रंथांचा तुलनात्मक अभ्यास करून सादर केलेला प्रबंध, इरावती कर्वे यांनी लिहिलेले 'युगांत' यावर कुरुंदकरांनी वेगवेगळ्या लेखांमध्ये सविस्तर विश्लेषण केलेले आहे. 

भीष्माचे वर्णन कुरुंदकर पराक्रमी साधू म्हणून करतात. ज्ञानी, महात्मा, पुण्यवान, तपस्वी, साधू, नीतिमान, पराक्रमी, वैराग्यशाली, इच्छामरणी; पण कौरवांच्या बाजूने जन्मभर उभा राहिलेला आहे अशी भीष्माची लोकमानसातील प्रतिमा आहे. भीष्म म्हणजे पापाच्या बाजूने उभे राहिलेले पुण्य असं कुरुंदकर म्हणतात. कौरवांच्या बाजूने उभे राहून भीष्माने नक्की काय साध्य केले असाही प्रश्न कुरुंदकर विचारतात. ते म्हणतात जगाच्या व्यवहारात आपण सज्जन असणे पुरेसे होत नाही, सज्जनाची बाजू घेऊन दुर्जनाविरुद्ध लढावेही लागते. हे ज्याला जमत नाही त्याच्यासाठी सज्जनपणाचे मोल काय असा खरा प्रश्न आहे.

कृष्णा वरील लेखामध्ये कुरुंदकरांनी कृष्णाचा ऐतिहासिक अंगाने विचार केला आहे. कृष्ण जीवनातील चमत्कारिक घटनांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. कर्ण खरंच दुर्दैवी होता का आणि डोळ्यांवर पट्टी बांधून गांधारीने धृतराष्ट्रा विषयी निष्ठा प्रकट केली की त्यावर सूड उगवला त्याचेही विश्लेषण त्यांनी केले आहे.

 भगवद्गीते विषयी भाष्य करताना कुरुंदकरांनी लोकमान्य टिळकांचे 'गीतारहस्य' तसेच डॉ ग श्री खैर आणि दामोदर कोसंबी यांच्या लेखाचे विश्लेषण केले आहे. आज आपल्यापुढे १८ अध्यायांची जी गीता आहे ती मूळ महाभारतामध्ये नसून नंतर कोणीतरी कृष्णाच्या तोंडी घातली आहे असे निरीक्षण बहुतेकांनी नोंदविले आहे. पहिल्या टप्प्यातील गीतेमधील ज्ञान की कर्म, सांख्य की याग एवढेच प्रश्न होते. इ स च्यापूर्वी पहिल्या दुसऱ्या शतकात परमेश्वर ठरल्यावर त्याच्या तोंडी गीता आणि चौथ्या शतकापासून सहाव्या शतकापर्यंत गीतेमध्ये भक्तीमार्ग आला आणि आठव्या शतकापासून आज पर्यंत प्रत्येकाने आपल्या सोयीनुसार गीतेतून तत्वज्ञान काढले असे कुरुंदकर म्हणतात.

बरेच लोक महाभारत  इस पूर्व ३१०१ मध्ये घडले असे मानतात. आज बहुतेक लोकांना महाभारत केवळ टीव्हीवरील मालिका पाहूनच माहिती आहे. खूपच थोड्या लोकांनी ते वाचले असेल. परंतु महाभारताचा केवळ पौराणिक अथवा धार्मिक दृष्ट्या विचार न करता ऐतिहासिक दृष्ट्या ते अभ्यासायचे असेल आणि हजारो वर्षांच्या काळात भारतीय संस्कृतीत कसे परिवर्तन होत गेले हे जाणून घ्यायचे असेल नरहर कुरुंदकर यांचे व्यासांचे शिल्प हे पुस्तक वाचणे क्रमप्राप्त आहे.


गुरुवार, ८ एप्रिल, २०२१

कर्ण खरा कोण होता ? लेखक - दाजी पणशीकर

कर्णाची वास्तव बाजू दर्शविणारे पुस्तक (प्रथमावृत्ती - १९७६ , ९ वि आवृत्ती - जुन २०१७ मॅजेस्टिक प्रकाशन) 

मृत्युन्जय , राधेय यासारख्या पुस्तकांतून कर्णाची थोरवी वाचत ज्या पिढ्या मोठ्या झाल्या त्यातलाच मी देखील एक. या दोन्ही पुस्तकांची मी एकेकाळी अक्षरशः पारायणे केली होती व कित्येकदा कर्णाच्या दुर्दैवावर अश्रू देखील ढाळले होते.  एवढेच नव्हे तर कर्णाच्या या उदात्त चारित्र्यावर आधारित अशी “मृत्युंजय” व “तो राजहंस एक” अशी दोन नाटके देखील वडिलांनी मला दाखविली होती व त्यामुळेच अनेकांप्रमाणे कर्ण हा माझा हिरो होता. 

पण अलीकडच्या काळात महाभारत वाचायला घेतलं व यातील काही कल्पनांना धक्के बसू लागले.  मग ते वर्णन मृत्युंजय शी तुलना करून पाहिलं पण मनाचं समाधान होत नव्हतं.  व त्याच वेळी कर्ण खरा कोण होता हे दाजी पणशीकर यांचे पुस्तक हातात पडलं व बऱ्याच गोष्टींचं  धुकं  निवळायला मदत झाली दाजींनी या पुस्तकात उद्धृत केलेले मूळ श्लोक ताडून पाहायला सुरुवात केली व कर्णाच एक वेगळं रूप समोर आलं. 

पुस्तकाच्या आत काय असावं याची कल्पना श्री धोंडो विठ्ठल देशपांडे यांनी लिहिलेल्या १४ पानी  प्रस्तावनेवरूनच येते. हे पुस्तक म्हणजे , पणशीकरांनी मराठा या वृत्तपत्रातून दर रविवारी लिहिलेल्या, तत्कालीन कर्ण विषयक लेखांचा संग्रह आहे.  सुमारे १८ लेखातून पणशीकरांनी कर्णाचे विविध पैलू समोर आणले आहेत.  व्यासांच्या महाभारतात सर्व व्यक्तिरेखा येतात त्या प्रसंगवर्णनातून.  कर्ण जन्मही असाच, त्यात त्याचा तीळभरही दोष नाही.  पण नंतर त्याच्या  प्रसंग-प्रवेशात त्याचे  स्वभावदोषही उलगडू लागतात. पणशीकर, यावेळी द्रोणांच्या स्पर्धेच्या रंगमंचावर प्रवेश करणारा विशीचा तरुण कर्ण, आपल्यापेक्षा पाच-सहा वर्षांनी लहान असणाऱ्या युवा अर्जुनाला द्वंद्वयुद्धाचे आव्हान देताना दाखवतात व आपल्याला देखील त्यांची वयं ध्यानात घेता, हा फरक स्पष्ट होऊ लागतो.  सूतपुत्र म्हणून हिणविला गेलेल्या कर्णाला लगेचच राजा करून दुर्योधनाने त्याला राज्याभिषेक करताच, तात्कालीन जातीयतेच्या भिंती किती तकलादू होत्या ते दाखवून दिले. 

यानंतरच्या दुर्योधनाच्या कारस्थानांमध्ये मात्र कर्णाचा सहभागच नव्हे, तर पुढाकार देखील होता असे काही वेळा दिसून येते.  पांडवांचा द्वेष करण्यासाठी दुर्योधनाला कारण तरी होते, पण कर्णाला मात्र असे कोणतेही सबळ कारण नव्हते. असे असताना पण त्याने घोष-यात्रेसाठी दुर्योधनाला प्रवृत्त केले.  तेथेही त्याला चित्रसेन गंधर्व कडून पराभूत होऊन पळावे लागले.  त्यानंतर विराटाच्या युद्धप्रसंगी देखील अर्जुनाने ज्या कौरवांचा पराभव केला त्यात कर्ण देखील  होता,  हे पणशीकर  नमूद करतात.  कृष्ण-कर्ण नात्याबद्दल जा गोष्टी मृत्युंजयातून फुलविल्या गेल्या त्याचा समाचार घेताना, “कृष्णाने कर्णाचेआर्जव का केले?” या प्रकरणात पणशीकरांनी कृष्ण-कर्ण युद्ध पूर्व संवादाची फोड करत, त्याचे सर्व पैलू उघड केले आहेत व त्यातील कृष्णाचा धुरंधरपणा कौरवांची बाजू कशी दुबळी करतो, तेच समजाविले आहे.

कर्णाला द्रोणांनी ब्रह्मास्त्र का नाकारले? हे देखील पणशीकर सप्रमाण स्पष्ट करतात आणि हेच प्रमाण मग परशुरामांकडून कर्ण ब्रह्मास्त्र मिळवितो तेव्हा कसे अधोरेखित होते हे दाखवून देतात 

द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग

द्रौपदी वस्त्रहरण प्रसंगाचा बराचसा दोष कर्णाच्या माथी तसा पण जातोच. “द्रौपदीच्या विटंबनेचा सूत्रधार” या लेखातून पणशीकरांनी ते अधिक स्पष्ट केले आहे.  मृत्युंजय कार त्यावर पश्चातापाचे पांघरुण घालत असताना पणशीकर मात्र कर्णाचे हे वैगुण्य उघडे पाडतात.

महायुद्धातील कर्ण 

प्रत्यक्ष युद्धाच्या वेळी कर्ण पहिले दहा दिवस युद्धा पासून दूर राहिला.  असे असले तरी या ताज्या दमाच्या कर्णाचा पुढच्‍या ७ दिवसात अनेकांनी पराभव देखील केला आहे.  युद्धपूर्व बैठकीत जेव्हा भीष्म, द्रोण, कृप, व  अश्वत्थामा, पांडवांचा पराजय करण्यासाठी किमान दहा दिवस किंवा जास्त कालावधी लागेल असे सांगत होते तेव्हा कर्ण मात्र “कर्णस्तु पंचरात्रेण  प्रतिजज्ञे  ने महास्त्रवित” म्हणजेच आपण केवळ पाच दिवसात त्यांचा निःपात करू अशी वल्गना करीत होता. आणि सेनापती बनल्यावर मात्र तो केवळ २ दिवसातच संपला. 

एवढं सगळं असून देखील कर्ण वीर होता व म्हणूनच कृष्णाला, त्याला अर्ध-निशस्त्र अवस्थेत का होईना, मारण्यासाठी अर्जुनाला प्रवृत्त करावे लागले, हेदेखील पणशीकर नमूद करतात.  अन्यायाचा  सल मनात ठेवून का होईना, पण कर्णाच्या वर्तनाने आणि त्याच्या अति पांडव द्वेषाने, त्याचा नेहमीच घात केला. 

कर्णाची दुसरी व वास्तव बाजू दर्शविणारे हे पुस्तक कदाचित कर्णप्रेमींना तितकेसे रुचणारे नाही मात्र कर्णाची हि बाजूदेखील विचारात घेण्यासाठी वाचणे आवश्यक आहे 


बुधवार, ७ एप्रिल, २०२१

हस्तिनापूर - मनोहर रं. शिरवाडकर

मोजक्या शब्दातील समर्पक व्यक्तिचित्रण  (प्रथमावृत्ती १९७२ , पुनर्मुद्रण - २०१९)

सत्तरीच्या दशकातील महाभारतावरील विविध अंगांचे विवेचन करणारी जी पुस्तके आली त्याच परंपरेतील म.रं. शिरवाडकर यांचे हे आणखी एक पुस्तक. यातदेखील महाभारताच्या काही अंगाचं नव्याने दर्शन घडते. विशेषतः चमत्कार , वर, शाप या संकल्पना व त्यांचा विशेषतः पांडवांवरील प्रभाव याचं उत्कृष्ट विवेचन या पुस्तकात आहे. महाभारतातील कोणकोणत्या  घटनांना वर शापांनी प्रभावी किंवा अतिरंजित केले आहे हे देखील शिरवाडकरांनी सप्रमाण स्पष्ट केले आहे. उदाहरण द्यायचं झालंच  तर द्रौपदी वस्रहरणाचा प्रसंग. हा प्रसंग प्रत्यक्षात कसा घडलेला नसावा व श्रीकृष्णाचा वस्त्र पुरविण्यात कोणताही सहभाग कसा नव्हता यावरील शिरवाडकरांचा युक्तिवाद मुद्देसूद व बिनतोड वाटतो. 

कृष्णानं अर्जुनाच सारथ्य का स्वीकारलं याची देखील छान उकल शिरवाडकर करतात व ते आपल्याला पटल्यावाचून राहात नाही. हे करताना अर्जुनाचा हळवा , भावुक स्वभाव आणि श्रीकृष्णची कर्तव्य कठोरता आपल्या मनावर बिंबत जाते. 

शिरवाडकरांनी कर्ण , अर्जुन, धृतराष्ट्र , युधिष्ठिर , भीम आणि द्रौपदी या पात्रांचीदेखील व्यक्तिचित्रे सुंदर रेखाटली आहेत आणि याचबरोबर महारथी सात्यकी आणि कौरव सेनापती झालेल्या पांडवांच्या मामाचं , शल्याचं  देखील. 

शतपुत्रा या प्रकरणात त्यांनी १०० कौरवांतील गांधारीपुत्र किती व कृतकपुत्र किती व का? याचं केलेलं स्पष्टीकरण देखील मुद्देसूद आहे. 

पुस्तक छोटेसेच असले तरी महाभारताविषयी कुतूहल असणाऱ्यांना वाचायला अतिशय सुंदर पूरक पुस्तक आहे. काहीसा वेगळा विचार ते नक्कीच देतं पण युगांत , व्यासपर्व सारखा आपला वेगळा ठसा ते उमटवत नाही.  


रविवार, ४ एप्रिल, २०२१

महाभारताचा मूल्यवेध - डॉक्टर रवींद्र शोभणे

महाभारताच्या विविध अंगांवर सुमारे दहा-बारा पुस्तकं वाचून झाल्यावर मी महाभारताचा मूल्यवेध हे डॉक्टर रवींद्र शोभणे यांचे पुस्तक हातात घेतलं. या आधीच्या पुस्तकांनी महाभारताविषयी ची बरीच कोडी सोडवायला मदत केली होती, त्यामुळे आता काय उरलय ही भावना होतीच आणि त्याचबरोबर उरलेली कोडी हे पुस्तक सोडवेल का हा प्रश्न देखील?

डॉक्टर शोभणे यांनी याआधी महाभारतावर आधारित उत्तरायण ही कादंबरी लिहिली आहे (मी ती वाचलेली नाही) आणि या कादंबरी स्वरूपात ज्या गोष्टी बऱ्याच गोष्टींची उकल त्यांना मांडता आली  नाही त्याचा अंतर्भाव त्यांनी मूल्यवेध या पुस्तकात केल्याचे त्यांनी या पुस्तकाच्या प्रास्ताविकात म्हटले आहे. 

मूल्यवेध  हे पुस्तक त्यांनी आठ प्रकरणांत विभागले आहे यात पहिल्या प्रकरणात महाभारत संहितेचं माहितीपूर्ण विवेचन आहे ज्यावर इरावती कर्वेंच्या युगांत चा प्रभाव जाणवतो. तसाच तो पुस्तकातील इतर प्रकरणावर प्रकरणांवर ही जाणवतो.  दुसऱ्या  प्रकरणात  आर्य संस्कृती चे वर्णन आहे यात मुख्यत्वेकरून वैदिक काळ, संस्कृती ,धर्मशास्त्रे, यज्ञसंस्था, वर्णव्यवस्था, कुटुंब पद्धती, विवाह संस्था, कृषी संस्कृती, व्यापार, देव आणि स्वर्ग संकल्पना, इत्यादीं बद्दल बरीच माहिती आहे

महाभारताच्या वाचकांसाठी यानंतरची प्रकरणे वाचावीशी वाटणारी आहेत. पुस्तक हळूहळू पकड घेते ते महाभारतातील पुरुष, स्त्रिया व महाभारतीय युद्ध या प्रकरणांमध्ये.  तर शेवटच्या तीन प्रकरणांमध्ये म्हणजेच वर-शाप, युद्धानंतर व पाऊलखुणा यात ही पकड हळू पुन्हा सुटत जाते. 

महाभारतातील पुरुष, महाभारतातील स्त्रिया व महाभारतीय युद्ध या प्रकरणांमध्ये बरीचशी वर्णने व निष्कर्ष इतर पुस्तकांतून येऊन गेलेले आहे. डॉक्टर शोभणे देखील इरावती बाईंची युगांत मधली मते मान्य करताना आढळतात.  मात्र शिखंडीनी चे शिखंडी बनणे आणि  द्रौपदीच्या जन्माचे कोडे हे कोडेच राहते. इतर काही कोड्यांची जसे द्रोण, कृप , कृपी यांचा जन्म,अश्वत्थाम्याचे नामकरण, परीक्षिताची जन्मकथा, द्रौपदी वस्त्रहरण कथा, सत्यवतीची जन्मकथा यांची उकल त्यांनी व्यवस्थितपणे केली आहे त्यामुळेच डॉक्टर शोभणेंच हे पुस्तक आपल्या ज्ञानात भर घालत असले तरी विचारांना फार वेगळी दिशा मात्र ते देत नाही.


शुक्रवार, १९ मार्च, २०२१

युगान्त - इरावती कर्वे

महाभारताच्या जिज्ञासू वाचकांसाठी जी काही दर्जेदार पुस्तकं उपलब्ध आहेत त्यात इरावती कर्वेंच्या युगांत चा वरचा क्रम लागतो. हा वरचा क्रम त्याच्या दर्जा वरून जसा आहे, तसाच तो विचार मंथनाच्या काळा वरून देखील आहे.  महाभारताची भांडारकर संस्थेची संशोधित प्रत त्याच्या प्रसिद्धीच्या शेवटच्या टप्प्यात असताना, उपलब्ध पर्वाचा संदर्भ घेत इरावतीबाईनी  आपलं वेगळं विचारमंथन सुरू केलं आणि १९६२ पासून यातील पात्र व प्रसंगावर वृत्तपत्रीय लिखाण सुरू केलं या आगळ्यावेगळ्या विचारमंथनाची परिणती म्हणजे १९६७ साली, म्हणजे  सुमारे ५०-५५ वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेलं  युगांत हे पुस्तक. 

इरावती बाईंनी यात महाभारताच्या भीष्म, गांधारी, कुंती, द्रौपदी, कर्ण,कृष्ण इत्यादी प्रमुख व्यक्तिरेखांचा सखोल आढावा घेतला व त्यांच्या स्वभावाचे मानवी पैलू देखील दाखविले. अनेक चमत्कृतीपूर्ण घटनांची संगती लावायचा प्रयत्न केला व तत्कालीन वैचारिक प्रवाहांना एक वेगळी दिशा दिली महाभारत व त्यातील पात्रे हा जर इतिहास असेल तर त्याचा विचार देखील त्याच पातळीवर व्हायला हवा हे त्यांनी प्रतिपादिले. 

यातील गांधारी वरचा त्यांचा लेख हा १९६२ सालचा व ललित लेखन प्रकाराच्या जवळ जाणारा. त्यामुळेच की काय पण यातल्या अद्भुताची म्हणजे शंभर गांधारी पुत्रांची जन्म-उकल यात नाही.  पण कुंतीच तसं नाही.  कुंतीवरचा लेख १९६६ सालचा व त्यात कर्ण जन्म, कवचकुंडलं इत्यादीची उकल करण्याचा प्रयत्न देखील आढळतो पण याचबरोबर काही अनुमान आहेत जी आज तितकीशी पटत नाहीत. 

पिता पुत्र हा विदुर युधिष्ठिरावरील लेख तर आजमितीला अनाठायी वाटतो कारण त्यानंतर बरेच चिंतन त्यांच्या नात्यावर झालेय  आणि युधिष्ठिराच्या जन्मावर देखील. 

भीष्मांची व्यथा दर्शविणारा लेख भीष्मांचं  आयुष्य उलगडत जातो तसंच त्यांची अगतिकता देखील.  आपल्या सर्व ईच्छांवर आपल्या पित्यासाठी पाणी सोडणाऱ्या भीष्मांवर आपल्या कित्येक पिढ्यांना सांभाळण्याची जबाबदारी येऊन पडतं त्याचं हळूवार वर्णन “शेवटचा प्रयत्न” या १९६५ च्या लेखात आढळत. 

द्रौपदी, कृष्ण या इतर व्यक्तीचित्रांमधूनच महाभारतीय घटनांचा पट उलगडतो तसाच द्रौपदी, कृष्ण व पांडव यांच्या नात्यांचा देखील आणि मग हे पुस्तक एकदा हातात घेतलं की ते संपेपर्यंत ठेववतच नाही. 

असं असलं तरी खटकणार्‍या बऱ्याच गोष्टी या पुस्तकात आहेत. कुंतीची शरीर यष्टी व पृथा नावाचा संबंध, तिचे  स्वयंवर, तिचे डावपेच, कृष्णाच्या वासुदेव बनण्याच्या महत्त्वाकांक्षेचे कथन, या गोष्टीदेखील विदुर आणि धर्म यांच्या नात्याच्या वर्णना  सारख्याच खटकतात पण त्याचा परामर्श श्री अनंत आठवले यांनी “महाभारताचे वास्तव दर्शन - आक्षेपांचा संदर्भात” या त्यांच्या पुस्तकात इतर अनेक लेखकांच्या पुस्तक आणि लेखांच्या संदर्भाने घेतला आहेच त्यामुळे त्याविषयी नंतर कधी तरी लिहिता  येईल. 

पण यातील सर्वच लेख माहितीपूर्ण आहेत व ओघवत्या शैलीत आपल्याला महाभारतातील प्राथमिक खाचाखोचांचे  मानवीकरण करत विचार करायला भाग पाडते.  सुमारे पन्नास-साठ वर्षांपूर्वी असा विचार करणे निश्चितच धाडसाचे होते म्हणूनच आजही चोखंदळ वाचकांसाठी महाभारत विचारमंथनाचे हे आद्य पुस्तक ठरते. याच कालावधीत दुर्गा भागवतांचे "व्यासपर्व", आनंद साधले यांचे "हा जय नावाचा इतिहास आहे",  शं के पेंडसे यांचे "महाभारतातील व्यक्ती दर्शन", इत्यादी पुस्तके देखील प्रसिद्ध झाली व ही सर्व वेगळ्या धाटणीची आणि स्वतःचे वेगळे अस्तित्व आणि वैशिष्ट्य दाखवणारी होती त्यांच्याबद्दल यथावकाश लिहीनच. 


सोमवार, १५ मार्च, २०२१

पर्व - डॉ एस एल भैरप्पा / मराठी भावानुवाद - डॉ सौ उमा कुलकर्णी.

 वास्तववादाने महाभारतातील अनेक कोडी सोडवणारी कादंबरी.

लहानपणापासून मी महाभारत अनेकदा वाचलंय , कधी गोष्टीरूपात तर कधी कादंबरी स्वरूपात. या प्रत्येक वाचनात महाभारता बद्दलचं गूढ वाढतच गेलं  व नंतर हळूहळू ते वाढलं कि महाभारत हे वास्तववादी न वाटता एक रचित काल्पनिक कथानक वाटू लागलं व याला 

कारणीभूत होत्या उदात्तीकरण केलेल्या काही घटना. मृत्युंजय  वाचताना  कर्ण आवडला तर युगंधर वाचताना कृष्ण मोहवून गेला. अर्जुनादी पांडवांनी पण मनात चांगलंच घर केलं.इतक्या पिढ्यांचं इतकं  सुसंगत वर्णन एखादा कथाकार कसं  रचू  हेही कळत नव्हतं पण बऱ्याचश्या अवास्तव वाटणाऱ्या घटना सत्यतेची ग्वाही देऊ  शकत नव्हत्या. पण डॉ एस एल भैरप्पा  यांचं   डॉ सौ उमा  कुलकर्णी यांनी अनुवादित केलेलं पर्व हे पुस्तक हातात पडलं व अनेक गोष्टींचा सहज उलगडा झाला आणि महाभारत खरं असावं कि खोटं?  हे द्वंद्व  देखील संपलं.

कौरव  पांडवांच्या जन्माच्या गुढापासूनचे अनेक प्रश्न होते,  मंत्राने कर्णाचा व इतर पांडवांचा जन्म झाला याचं स्पष्टीकरण कसं असेल ? समाज स्वीकारार्ह मुलं पंडुराजा सोबत असताना कशी झाली असतील? एवढे १०० कौरवांना  गांधारीने कसा जन्म दिला असेल ? चिरंजीवी भीष्म काय वयाचे असतील ?  ते रणात शर शय्येवर झोपले म्हणजे नक्की काय ?आंधळ्या धृतराष्ट्राचा विवाह गांधारीशी का व कसा झाला असेल ? भैरप्पांनी हे समजावताना समाजप्रथांचे  साधार प्रमाण असे दिले आहेत कि आपल्याला सहज पटतं.

भीष्म जन्म समजण्यासाठी आपल्याला शंतनू व गंगा नदी यांच्यामधला विवाह व त्याच देवत्व आणि शापित्व असं बराच काही समजावं लागतं. भैरप्पांनी  मात्र ते सहजपणे मानवी स्वभावात व जमातींच्या चालीरीतींच्या चौकटीत बंदिस्त केलं आहे व असं घडणं शक्य आहे व तेदेखील गंगेच्या आधीच्या सात पुत्रांना न मारता , हे आपण मान्य करतो.

द्यूतसभेतील द्रौपदी वस्रहरणाचा प्रसंगच घ्या ना. सर्व कथानकं कृष्णाला देवत्व बहाल करत असताना भैरप्पा मात्र मानवी चौकटीत द्रौपदीच्या भर सभेतील कृष्ण सामर्थ्याच्या धमकीने हा प्रश्न चुटकीसरशी सोडवतात.

असा कोणताही प्रसंग असो, तुम्हाला याच मातीच्या पावलात त्याचं  उत्तर नक्कीच मिळेल व खात्री पटेल कि अशा घटना घडली कशा असतील. संजयने धृतराष्ट्राला युद्ध प्रसंग कसे सांगितले असतील? भीमाने हिडिंबा , बकासुर अशा राक्षसांचा सामना कसा केला असेल? अर्जुन नागलोकात , देवलोकात म्हणजे नक्की  कोठे गेला असेल? तो देवराज इंद्राला असा भेटला असेल?…. या सर्व प्रश्नांना केवळ आपल्याला समाधानकारक उत्तरेच मिळतात असे नाही तर आपणही त्या पद्धतीचा विचार करायला उद्युक्त होतो हेच या पुस्तकाचे मोठे यश आहे.

ज्यांनी महाभारत वाचलंय त्यांनी तर पर्व वाचायलाच हवी. १९९१ मध्ये मराठीत डॉ सौ उमा  कुलकर्णी यांनी अनुवादित केलेलं हे पुस्तक माझ्या खूपच उशिरा म्हणजे गेल्यावर्षी  हातात पडलं. हल्लीच मी ते दुसऱ्यांदा वाचायला घेतलं. मूळ कन्नड पुस्तक तर १९७९ सालचं  आहे. यात भैरप्पांची प्रचन्ड भटकंती व मेहनत आहे यामुळेच  एका महाकाव्याचे सहज सोपे सादरीकरण करणारे ते आधुनिक व्यास महर्षींच ठरतात