शुक्रवार, २३ एप्रिल, २०२१

महाभारत एक सूडाचा प्रवास - दाजी पणशीकर

 प्रथमावृत्ती  १९७७ , नववी आवृत्ती - नोव्हेंबर २०१९


महाभारताच्या प्रत्येक अभ्यासकाला ते वेगवेगळे गवसलं.  कोणी त्यात व्यक्तिदर्शन शोधलं, तर कोणी त्यातील पात्रांच्या तोंडून संपूर्ण कथा कशी असेल ते वदविले. हे करताना त्यातून कृष्ण, कर्ण, दुर्योधन, अर्जुन यांसारखे अनेक महानायक पण तयार केले.  महाभारताचा विविध अंगाने अर्थ लावायचा प्रयत्न विविध लेखकांनी केला.  दाजी पणशीकर यांचा या पुस्तकातील प्रयत्न हा असाच एक “सूड” हि  वेगळी मध्यवर्ती संकल्पना उलगडण्याचा प्रयत्न होता व तो कमालीचा यशस्वी झालाय. 

१९७७ साली  प्रथम प्रसिद्ध झालेल्या महाभारत - एक सूडाचा प्रवास, या दाजी पणशीकर यांच्या पुस्तकाला नरहर कुरुंदकर यांची विस्तृत प्रस्तावना आहे.  हीच प्रस्तावना पुढे "व्यासांचे शिल्प" या नरहर कुरुंदकरांच्या लेखांचं / प्रस्तावनांचे संकलन असलेल्या पुस्तकात देखील संकलित केली आहे. 

महाभारत घडण्यास कारण ठरलेल्या क्रोधातून जन्मलेल्या सूड या संकल्पनेभोवती  या पुस्तकाचा विषय उलगडला जातो.  याची सुरुवात होते ते परशुरामांचा क्रोध व सूड  उलगडून.  आणि महाभारताची सुरुवात पणशीकर यांच्या मते होते ते अंबेच्या प्रतिशोधाच्या धुमसणाऱ्या आगीतून. काशीराजाच्या अंबा, अंबिका व अंबालिका या तीन कन्यांच्या स्वयंवरासाठी भीष्म पोहोचतात ते राजकुमार विचित्रविर्यासाठी.  आणि या पळवून आणलेल्या मुलींपैकी अंबा जेव्हा आपले शाल्व  राजावर प्रेम असल्याचे हस्तिनापुरात त्यांना सांगते, तेव्हा ते तिला सन्मानाने शाल्वाकडे परत देखील पाठवतात.  पण दुसऱ्याने पळवलेली मुलगी, म्हणून शाल्व तिला स्वीकारायला नकार देतो.  प्रतिज्ञाबद्ध भीष्मही  तिला स्वीकारत नाहीत आणि मग संतप्त अंबा याचा सूड म्हणून भीष्मांच्या विनाशासाठी विविध उपाय योजते.  अगदी परशुरामांना ही भरीस  घालते पण शेवटी तिचा निरुपाय होतो आणि ती अग्नीसमर्पण करते तेच भीष्मनाशासाठी पुनर्जन्म घेण्याच्या इच्छेने.  सुडाची ही साखळी व्यवस्थितपणे मांडण्यासाठी पणशीकरांनी या पुस्तकातील आठ प्रकरणे वापरली आहेत. 

द्रुपद व द्रोण यांच्यातील कटुतेचा उद्रेक हि सुडाची अजून एक साखळी.  द्रुपदाला बालमित्र म्हणून भेटायला गेलेल्या द्रोणाचा, राजा द्रुपद अपमान करतो, आणि द्रोण मग सूडाच्या भावनेने पेटून उठतात.  त्यांच्या पुढच्या सर्व क्रिया, त्यांचे कुरू दरबारात जाणे,  राजपुत्रांना शिकवणे, त्यांच्याकडून द्रुपदाला बंदी बनवून आणण्याची गुरुदक्षिणा मागणे, हे  सारे काही द्रुपदाचा सुड घेण्यासाठी.  आणि तो घेतला गेल्यावर द्रुपद सुडाने पेटून उठतो तो द्रोणांना संपविण्यासाठी  आणि मग दुसरे सूडचक्र सुरू करतो.  ते मग दृष्टद्युम्न,  द्रौपदी यांना जन्माला घालण्यापासून ते अंतिम युद्धात द्रोणाचा शिरच्छेद दृष्टद्युम्न करेपर्यंत संपतच नाही.  आणि यामध्येही अनेक लहान मोठी सूडचक्र सुरूच राहतात.  द्रौपदी स्वयंवर प्रसंगी कर्णाचा अपमान करते याचा प्रतिशोध कर्ण घेत राहतो, प्रत्येक वेळी तिला अपमानित करण्याची संधी शोधत.  दुर्योधनाला त्याची साथ मिळत जाते आणि त्यातून निर्माण होणारे  सूडचक्र तर सर्वांनाच गिळंकृत करते.  यातच मध्ये जन्मांधांच्या अंधारयात्रेचे चक्र आहे आणि डोळस गांधारीचे देखील. 

महाभारत युद्धाचा अंत देखील सूडचक्रामुळेच करुण झाला आहे.  आपल्या पित्याच्या हत्येने सूडाग्नी प्रज्वलित झालेला अश्वत्थामा, युद्ध संपल्यानंतर पांचालांच्या शिबिरात निद्रिस्त असलेल्या पांचाल सेनापती दृष्टद्युम्न, द्रौपदीची पाच मुले, शिखंडी इत्यादींची रात्री अमानुष हत्या करतो आणि या सूड  चक्राची पुढची पायरी गाठतो.  

अशा या संहार पर्वाचे वर्णन दाजी पणशीकरांनी व्यवस्थित उलगडून दाखवले आहे व ते देखील विविध श्लोकांचे प्रमाण देत, आणि त्यांचा अर्थ विशद करीत.  त्यामुळेच महाभारत कथानकातील बारीक-सारीक पैलू देखील एका वेगळ्या स्वरुपात आपल्या समोर उघड होतात. पणशीकरांचा महाभारताचा अभ्यास, त्यांचे त्यावरील चिंतन, आणि विषय समजावण्याची हातोटी केवळ अप्रतिम आहे व म्हणूनच महाभारताचे सूड हे अंग समजावून घ्यायचे असेल तर हे पुस्तक वाचणे आवश्यक ठरते. 


२ टिप्पण्या:

अनिरुद्ध म्हणाले...

महेश, सुंदर परिक्षण! तुझी भाषा शुद्ध आणि ओघवती आहे. तुझ्या अभ्यासू मनोवृत्तीला प्रणाम! तुझ्या परिक्षणामुळे मूळ पुस्तक वाचावेसे वाटले.

Mahesh Naik म्हणाले...

धन्यवाद अनिरुद्ध