शनिवार, १० एप्रिल, २०२१

व्यासांचे शिल्प, लेखक - नरहर कुरुंदकर

 (श्री विनोद थोरात यांच्या फेसबुक वॉल वरून साभार घेऊन संक्षिप्त केलेला पुस्तकअभिप्राय)

महाभारताचा अभ्यास विविध प्रकारे करता येतो. काही लोक संस्कृतीची परिवर्तने शोधण्यासाठी, काही लोक संस्कृतीची रूपे आणि विविधता शोधण्यासाठी तर काही लोक धर्मश्रद्धा म्हणून महाभारत वाचतात. 'व्यासांचे शिल्प' या पुस्तकात कुरुंदकरांनी महाभारताचा अभ्यास ऐतिहासिक दृष्टीने केलेला आहे.

महाभारतामध्ये प्रत्येक शतकात काहीना काही भर पडत गेली आहे. महाराष्ट्रामध्ये प्रचलित आणि लोकप्रिय असणारी महाभारताची प्रत म्हणजे 'नीलकंठी प्रत'. परंतु ही काही मूळ महाभारताची प्रत नाही याची सर्वांना जाणीव होती. निळकंठी प्रतीच्या जास्तीत जास्त मागे जाण्याचे उद्देशाने पुणे येथील भांडारकर प्राच्यविद्या संस्थेमार्फत कै डॉ सुखटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली १९२७ साली विद्वानांनी कार्य करण्यास सुरुवात केली. ही आवृत्ती तयार करण्यासाठी तेलुगू मधील आंध्र महाभारत, जावा येथील महाभारत, काश्मीर मधील शारदा प्रत, महाभारतावरील सर्वात जुनी टीका लिहिणारा देवबोध, महाभारत सारांश सांगणारा क्षेमेंद्र  याची 'भारतमंजिरी' अशा अनेक प्रतींचा अभ्यास करण्यात आला. शेवटी १९६६ साली महाभारताची चिकित्सक आवृत्ती तयार झाली. याला 'भांडारकर प्रत' असे म्हणतात. कुरुंदकर ही चिकित्सक आवृत्ती इस १००० च्या सुमाराची मानतात.

कुरुंदकर म्हणतात, महाभारत हा सातत्याने प्रक्षेप होत जाणारा ग्रंथ आहे. तसेच त्याचे अनेकदा पुनर्लेखनही झाले आहे. कोण एके काळी हा ग्रंथ भृगू ऋषी कुळाच्या हातात पडला आणि भृगुंनी आपल्या परंपरागत कथा महाभारतात बसवून दिलेल्या आहेत. गुप्तकाळात आणि त्यानंतरच्या काळातही महाभारतात फार मोठी भर पडलेली दिसते. चिकित्सक आवृत्तीच्या सहाय्याने गणपतीने महाभारत लिहिणे, द्रौपदीची अक्षय थाळी, दुर्वास ऋषीनी घेतलेली पांडवांची परीक्षा, द्रौपदी स्वयंवरातील कर्णाची भूमिका या सर्व आणि अशा अनेक गोष्टी मूळ महाभारतामध्ये नसून नंतर कोणीतरी घुसवण्यात आल्याचे कुरुंदकर सांगतात.  

दाजी पणशीकर यांनी लिहिलेले 'महाभारत - एक सूडाचा प्रवास', नारायण गोविंद नांदापूरकर यांनी व्यासांचे मूळ महाभारत, मुक्तेश्वर यांचे त्यावरील काव्य आणि मोरोपंतांचे 'आर्याभारत' या तीन ग्रंथांचा तुलनात्मक अभ्यास करून सादर केलेला प्रबंध, इरावती कर्वे यांनी लिहिलेले 'युगांत' यावर कुरुंदकरांनी वेगवेगळ्या लेखांमध्ये सविस्तर विश्लेषण केलेले आहे. 

भीष्माचे वर्णन कुरुंदकर पराक्रमी साधू म्हणून करतात. ज्ञानी, महात्मा, पुण्यवान, तपस्वी, साधू, नीतिमान, पराक्रमी, वैराग्यशाली, इच्छामरणी; पण कौरवांच्या बाजूने जन्मभर उभा राहिलेला आहे अशी भीष्माची लोकमानसातील प्रतिमा आहे. भीष्म म्हणजे पापाच्या बाजूने उभे राहिलेले पुण्य असं कुरुंदकर म्हणतात. कौरवांच्या बाजूने उभे राहून भीष्माने नक्की काय साध्य केले असाही प्रश्न कुरुंदकर विचारतात. ते म्हणतात जगाच्या व्यवहारात आपण सज्जन असणे पुरेसे होत नाही, सज्जनाची बाजू घेऊन दुर्जनाविरुद्ध लढावेही लागते. हे ज्याला जमत नाही त्याच्यासाठी सज्जनपणाचे मोल काय असा खरा प्रश्न आहे.

कृष्णा वरील लेखामध्ये कुरुंदकरांनी कृष्णाचा ऐतिहासिक अंगाने विचार केला आहे. कृष्ण जीवनातील चमत्कारिक घटनांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. कर्ण खरंच दुर्दैवी होता का आणि डोळ्यांवर पट्टी बांधून गांधारीने धृतराष्ट्रा विषयी निष्ठा प्रकट केली की त्यावर सूड उगवला त्याचेही विश्लेषण त्यांनी केले आहे.

 भगवद्गीते विषयी भाष्य करताना कुरुंदकरांनी लोकमान्य टिळकांचे 'गीतारहस्य' तसेच डॉ ग श्री खैर आणि दामोदर कोसंबी यांच्या लेखाचे विश्लेषण केले आहे. आज आपल्यापुढे १८ अध्यायांची जी गीता आहे ती मूळ महाभारतामध्ये नसून नंतर कोणीतरी कृष्णाच्या तोंडी घातली आहे असे निरीक्षण बहुतेकांनी नोंदविले आहे. पहिल्या टप्प्यातील गीतेमधील ज्ञान की कर्म, सांख्य की याग एवढेच प्रश्न होते. इ स च्यापूर्वी पहिल्या दुसऱ्या शतकात परमेश्वर ठरल्यावर त्याच्या तोंडी गीता आणि चौथ्या शतकापासून सहाव्या शतकापर्यंत गीतेमध्ये भक्तीमार्ग आला आणि आठव्या शतकापासून आज पर्यंत प्रत्येकाने आपल्या सोयीनुसार गीतेतून तत्वज्ञान काढले असे कुरुंदकर म्हणतात.

बरेच लोक महाभारत  इस पूर्व ३१०१ मध्ये घडले असे मानतात. आज बहुतेक लोकांना महाभारत केवळ टीव्हीवरील मालिका पाहूनच माहिती आहे. खूपच थोड्या लोकांनी ते वाचले असेल. परंतु महाभारताचा केवळ पौराणिक अथवा धार्मिक दृष्ट्या विचार न करता ऐतिहासिक दृष्ट्या ते अभ्यासायचे असेल आणि हजारो वर्षांच्या काळात भारतीय संस्कृतीत कसे परिवर्तन होत गेले हे जाणून घ्यायचे असेल नरहर कुरुंदकर यांचे व्यासांचे शिल्प हे पुस्तक वाचणे क्रमप्राप्त आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: