सोमवार, १२ फेब्रुवारी, २०२४

ऋग्वेदातील नासदीय सूक्त १०. १२९

 

नासदीय सूक्त १०. १२९ 


ऋग्वेदाच्या १०व्या मंडलातील १२९ सूक्त नासदीय सूक्त म्हणून ओळखले जाते कारण याची सुरुवातचाच “ना असत” या शब्दांनी होते. अवघ्या ७ ऋचांचे हे सूक्त सृष्टीनिर्मितीबद्दलचे अतिशय उत्कृष्ट सूक्त मानले जाते. या सूक्ताचा कर्ता ऋषी मात्र ज्ञात नाही. याची रचना त्रिष्टुप छंदात केलेली आहे. बुद्धी व कल्पनाशक्तीचा अतर्क्य मिलाप दाखविणारे हे सूक्त खरंच वाखाणण्याजोगे आहे. सृष्टिपूर्व प्रलयावस्था, जीवनिर्मिती, सृष्टीनिर्मितीची अगम्यता असे विविध विषय आपल्याला या लघुसूक्तात पाहायला मिळतात. सत (व्यक्त जग) व असत (अव्यक्त जग) यातील काहीच अस्तित्त्वात नसण्यापासूनच सर्व जगाच्या निर्मितीची सुरुवात होते, अशा प्रकारचे वर्णन यातील ऋचांमध्ये येते.  या सुक्तानेच अद्वैत सिद्धांताचा पाय घातला असावा. 


नासदासीन्नो सदासीत्तदानीं नासीद्रजो नो व्योमा परो यत् । किमावरीवः कुह कस्य शर्मन्नम्भः किमासीद्गहनं गभीरम् ॥१।।


जेव्हा असत नव्हते आणि सत देखील नव्हते, त्याठिकाणी कोणतेही लोक (सप्तलोक, सप्तपाताळ यापैकी) नव्हते , व्योम नव्हते, अशा स्थितीत हे आवरण कुणी निर्माण केलं? कुणाच्या आनंदासाठी निर्माण केलं ? आणि खळ खळ आवाज करणारे हे काय होते? हे खरंच गूढ आणि गहन आहे. 


न मृत्युरासीदमृतं न तर्हि न रात्र्या अह्न आसीत्प्रकेतः । आनीदवातं स्वधया तदेकं तस्माद्धान्यन्न परः किं चनास ॥२।।


तिथे मृत्यूही नाही आणि अमृतही नाही. रात्रही नाही आणि दिवसही नाही. आणि वाट (वायू) नसतानादेखील काही प्रक्रिया घडत आहे. तिथे कुणीही अन्य दिसत नाही. 


तम आसीत्तमसा गूळ्हमग्रेऽप्रकेतं सलिलं सर्वमा इदम् । तुच्छ्येनाभ्वपिहितं यदासीत्तपसस्तन्महिनाजायतैकम् ॥३।।

आता या अंधारात काही दिसू लागलं आहे. प्रथम तम् रूप आणि आकार नसलेले निराकार गतिमान जलतत्त्व सर्वत्र भरून राहिले.. काही तुच्छ (लहान) काही तेजस्वी असे काही. ते तपाने एका बीजरुपात अवतीर्ण झाले. 


कामस्तदग्रे समवर्तताधि मनसो रेतः प्रथमं यदासीत् । सतो बन्धुमसति निरविन्दन्हृदि प्रतीष्या कवयो मनीषा ॥४।।

ज्यांना वाढण्याची इच्छा होती ते मोठे झाले. यातून निर्मितीची इच्छा तयार झाली. व दोन ज्ञानी माहात्म्यांमधे अस्तित्त्वाची बंधुभावाची बीजे रोवली गेली, इच्छा तयार झाली.  


तिरश्चीनो विततो रश्मिरेषामधः स्विदासी३दुपरि स्विदासी३त् । रेतोधा आसन्महिमान आसन्त्स्वधा अवस्तात्प्रयतिः परस्तात् ॥५।।


त्यांच्या तिरप्या किरणांच्या मोजमापांतून खाली वर अशी दिशांची निर्मिती झाली. ज्याला महान व्हायचे होते त्याने स्वतः हून या प्रक्रियेला सुरुवात केली. 


को अद्धा वेद क इह प्र वोचत्कुत आजाता कुत इयं विसृष्टिः । अर्वाग्देवा अस्य विसर्जनेनाथा को वेद यत आबभूव ॥६।।


कोण समजेल वेद? याच्याबद्दल कोण सांगेल? हि विशेष सृष्टी कुठून आली? देवसुद्धा या प्रक्रियेत नवीन आहेत. त्यांना तरी याबद्दल माहित असेल का? 


इयं विसृष्टिर्यत आबभूव यदि वा दधे यदि वा न । यो अस्याध्यक्षः परमे व्योमन्त्सो अङ्ग वेद यदि वा न वेद ॥७।।


या सृष्टीत जे घडलेले आहे ते जाणणारा अथवा न जाणणारा अस्तित्त्वात असेल का ? तो अध्यक्ष कुठेतरी उच्च आकाशात आहे त्याला तरी हे माहित असेल का? किंवा त्यालाही हे माहीत नाही. 


अशा रीतीने नासदीय सूक्त अनेक प्रश्न निर्माण करत सृष्टी कशी निर्माण झाली असेल याचे उत्तर द्यायचा प्रयत्न करीत, शेवटी हा प्रश्न अनुत्तरीतच ठेवते. यात या सूक्ताच्या कर्त्यांची बुद्धिझेप खरंच उत्तुंग आहे. 


ऋग्वेदातील वाक अंभ्रूणीय सूक्त १०. १२५

 

अवघ्या ८ ऋचांचे हे लघु सूक्त वाक अथवा वाणी या देवतेची संकल्पना धरून रचलेले आहे. वाक हि अंभ्रूणी या ऋषींची कन्या. म्हणून या सुक्ताला “वाक अंभ्रूणीय” म्हणून देखील ओळखले जाते. अंभ्रूणी हे ऋषी या सूक्ताचे कर्ते आहेत. 

वाणीचा प्रभाव सर्व जगतावर कसा पडला आहे हे दर्शविणारे हे सूक्त म्हणजे वाक देवतेची आत्मस्तुती आहे. आपला प्रभाव कसा व कुठे पडतो याचे वर्णन वाक देवता या सुक्ताद्वारे करते. 


अहं रुद्रेभिर्वसुभिश्चराम्यहमादित्यैरुत विश्वदेवैः । अहं मित्रावरुणोभा बिभर्म्यहमिन्द्राग्नी अहमश्विनोभा ॥१।।


मीच रुद्र (१२) व वसू (८) , विश्वदेव  यांच्या समूहाबरोबर आहे. मी आदित्य (१२), वरून, अग्नी, इंद्र, अश्विन (२) यांच्या सोबत चालते. 


अहं सोममाहनसं बिभर्म्यहं त्वष्टारमुत पूषणं भगम् । अहं दधामि द्रविणं हविष्मते सुप्राव्ये यजमानाय सुन्वते ॥२।।


आवेशाचा दणदणाट उडवून देणारा सोम मीच धारण करते म्हणजे, माझ्याच सांगण्यावरून सोम बनविला जातो. त्थाष्टि, पुषण , भग यांना मीच साहाय्य करते. माझ्याच सांगण्यावरून हवि  दिला जातो (म्हणजे हवि  देण्यासाठी लागणाऱ्या मंत्रांचे उच्चरण माझ्याच मुळे होते). 


अहं राष्ट्री संगमनी वसूनां चिकितुषी प्रथमा यज्ञियानाम् । तां मा देवा व्यदधुः पुरुत्रा भूरिस्थात्रां भूर्यावेशयन्तीम् ॥३।।


राष्ट्राला संपत्ती देणारी, समृद्ध करणारी व पर्यायाने राष्ट्रनिर्मिती करणारी  मीच आहे. यज्ञाचा प्रथम हवि देखील मलाच दिला जातो.  म्हणूनच देवांनी मला वेगवेगळ्या वेळी विविध नावानी वर्णन केले कारण मी असंख्य ठिकाणी असंख्य रूपात वास करणारी आहे. 


मया सो अन्नमत्ति यो विपश्यति यः प्राणिति य ईं शृणोत्युक्तम् । अमन्तवो मां त उप क्षियन्ति श्रुधि श्रुत श्रद्धिवं ते वदामि ॥४।।


जो अन्न खातो, पाहतो, श्वास घेतो, ऐकतो ते सर्व माझ्या शक्तीनेच करतो. (जो वाणीचा आधार घेतो त्याला ते ते मिळते). हे सर्व मी श्रद्धावानालाच सांगते. जे माझे ऐकत नाहीत त्यांचा क्षय होतो. 


अहमेव स्वयमिदं वदामि जुष्टं देवेभिरुत मानुषेभिः । यं कामये तंतमुग्रं कृणोमि तं ब्रह्माणं तमृषिं तं सुमेधाम् ॥५।।


मी देवांमध्येही आहे व मनुष्यांमध्येही. ज्याला ज्याची इच्छा आहे ते मी करते. आणि हे मी चांगल्या बुद्धीच्या (सुमेधस) लोकांसाठीच करते.  


अहं रुद्राय धनुरा तनोमि ब्रह्मद्विषे शरवे हन्तवा उ । अहं जनाय समदं कृणोम्यहं द्यावापृथिवी आ विवेश ॥६।।

मीच रुद्राचे धनुष्य ताणते म्हणजे ब्रम्हाचा द्वेष करणाऱ्याचा नाश होतो. मी सर्व युद्धजन्य जनांना सारखेच ठेवते. मी पृथ्वीपासून आकाशापर्यंत आहे. 


अहं सुवे पितरमस्य मूर्धन्मम योनिरप्स्वन्तः समुद्रे । ततो वि तिष्ठे भुवनानु विश्वोतामूं द्यां वर्ष्मणोप स्पृशामि ॥७।।


माझे पैतृक मी पृथीवर आणले आहे. मी समुद्राच्या पाण्यातून वर आले आहे आणि तेथून या सर्व जगतात पसरले आहे. 


अहं सुवे पितरमस्य मूर्धन्मम योनिरप्स्वन्तः समुद्रे । ततो वि तिष्ठे भुवनानु विश्वोतामूं द्यां वर्ष्मणोप स्पृशामि ॥८।।


मी वायू आहे त्यामुळे विश्वाला वाणीचे अस्तित्त्व समजेल मी अशीच भुवने निर्माण करीत जाते. पूर्वी या आधीही माझ्याकडून पृथ्वीचे निर्माण झाले आहे. 


ऋग्वेदातील पुरुष सूक्त (१०.९०)

 पुरुष सूक्त हे ऋग्वेदाच्या १० व्या मंडलातील ९० वे सूक्त आहे. यात १६ ऋचांमध्ये विराट पुरुषाचे व पृथ्वीवरील जीवोत्पत्तीचे वर्णन आहे. यातील सुरुवातीच्या ५ ऋचा विराट पुरुषाच्या वर्णनाच्या आहेत तर उरलेल्या ११ ऋचांमध्ये विश्वनिर्मितीची प्रक्रिया कशी साकारत गेली असावी याचे वर्णन आहे. या सूक्ताचा कर्ता ऋषी “नारायण” असून देवता “पुरुष” आहे. 


स॒हस्र॑शीर्षा॒ पुरु॑षः सहस्रा॒क्षः स॒हस्र॑पात् । स भूमिं॑ वि॒श्वतो॑ वृ॒त्वात्य॑तिष्ठद्दशाङ्गु॒लम् ॥१।।


या पहिल्या मंत्रामधून आपल्याला एका सहस्त्र शीर्ष असलेल्या विराट पुरुषाचे वर्णन मिळते. यातील सहस्त्र हा शब्द “असंख्य”, “अनंत”, ”विराट” अशा अर्थाने येतो कारण या पुरुषाला  जशी सहस्त्र शीर्षे आहेत तसेच त्याला सहस्त्र अक्ष (डोळे) व सहस्त्र पाद देखील आहेत. तो एवढा विशाल आहे कि सर्व जगताला व्यापल्यानंतरही दशांगुळे उरला आहे. 


पुरुष एवेदं सर्वं यद्भूतं यच्च भव्यम् । उतामृतत्वस्येशानो यदन्नेनातिरोहति ॥२


हा जो विराट पुरुष आहे तो सर्व सृष्टीचा स्वामी आहे. जे पूर्वी होऊन गेले अथवा जे पुढे घडायचे आहे त्याचाही स्वामी हाच आहे. अमृत व जरा मृत्यूरहीत स्थितीचा स्वामी देखील तोच व जे अन्न प्राशन करून वाढतात त्या प्राण्यांचा  स्वामी हाच आहे. 


एतावानस्य महिमातो ज्यायाँश्च पूरुषः । पादोऽस्य विश्वा भूतानि त्रिपादस्यामृतं दिवि ॥३।।


एवढा मोठा महिमा असलेला हा पुरुष एवढा विराट आहे कि हे भूत विश्व त्याच्या  केवळ एक चतुर्थांश  भागात सामावलेले आहे तर त्याचे इतर ३ भाग अंतराळात आहेत.  म्हणजेच ते एवढे विशाल आहेत कि आपल्याला त्याचा थांग लागू शकत नाही. 


त्रिपादूर्ध्व उदैत्पुरुषः पादोऽस्येहाभवत्पुनः । ततो विष्वङ्व्यक्रामत्साशनानशने अभि ॥४।।


असा हा तीन ऊर्ध्व पद अंतराळात असलेला पुरुष अवतीर्ण झाला. त्याचा हा ४ था पदांश प्रलय व निर्मिती या सृष्टिनिर्मिती प्रक्रियेतून जात असतो. साशन (अन्नामुळे चेतन असलेले ) व अनशन (अन्न नसल्याने अचेतन असलेले )  असे दोन्ही पदार्थ त्याने व्यापून टाकले. 


तस्माद्विराळजायत विराजो अधि पूरुषः । स जातो अत्यरिच्यत पश्चाद्भूमिमथो पुरः ॥५।।


यातूनच “विराट” पुरुष उत्पन्न झाला. पण परमात्मस्वरूप पुरुष त्याहीपेक्षा वर होता. विराट पुरुषाने त्यापुढे जात, भूमी व पुरे (शरीरे) निर्माण केली. 


यत्पुरुषेण हविषा देवा यज्ञमतन्वत । वसन्तो अस्यासीदाज्यं ग्रीष्म इध्मः शरद्धविः ॥६।।


जेव्हा या विराट पुरुषाला यज्ञार्पणाचा  हवि योजला तेव्हा वसंत ऋतू त्याचा आज्य (घृत) बनला, ग्रीष्म ऋतू इंधन (समिधा) व शरद ऋतू हवि  (आहुती) झाला. 


तं यज्ञं बर्हिषि प्रौक्षन्पुरुषं जातमग्रतः । तेन देवा अयजन्त साध्या ऋषयश्च ये ॥७।।


या मानस यज्ञातून जो सर्वांच्या पूर्वी उत्पन्न झाला, त्यावर प्रोक्षण (सिंचन ) आणि या हवनयोग्य पुरुषाच्या योगाने देवांनी आणि “साध्य” (नावाच्या) ऋषींनी त्याचे यजन केले. 


तस्माद्यज्ञात्सर्वहुतः सम्भृतं पृषदाज्यम् । पशून्ताँश्चक्रे वायव्यानारण्यान्ग्राम्याश्च ये ॥८।।


सर्व प्रकारची आहुती दिलेल्या त्या यज्ञापासून पृषत (दही) व आज्यम (घृत) जमा झाले. व त्यानंतर पशु, हवेतील पक्षी, अरण्यातील प्राणी, ग्रामपशू आदी निर्माण झाले.  


तस्माद्यज्ञात्सर्वहुत ऋचः सामानि जज्ञिरे । छन्दांसि जज्ञिरे तस्माद्यजुस्तस्मादजायत ॥९।।


सर्व प्रकारची आहुती दिलेल्या त्या यज्ञापासून ऋचा, सामवेदाचे  मंत्र निर्माण झाले तसेच छंद व यजुर्वेदाचा उदय झाला. 


तस्मादश्वा अजायन्त ये के चोभयादतः । गावो ह जज्ञिरे तस्मात्तस्माज्जाता अजावयः ॥१०।।


त्यातूनच अश्व निर्माण झाले. ज्यांना वरचे व खालचे असे दोन प्रकारचे दात (अथवा जबडा) असतो असे पशु उत्पन्न झाले. त्यातूनच गायी, शेळ्या, मेंढ्या, बोकड (अज ) निर्माण झाले. 


यत्पुरुषं व्यदधुः कतिधा व्यकल्पयन् । मुखं किमस्य कौ बाहू का ऊरू पादा उच्येते ॥११।।


जेव्हा या पुरुषासाठी अवयवांची योजना केली तेव्हा कोणते अवयव कल्पिले? त्याचे मुख, बाहू, मांड्या, पाय कोणते ठरविण्यात आले. 


ब्राह्मणोऽस्य मुखमासीद्बाहू राजन्यः कृतः । ऊरू तदस्य यद्वैश्यः पद्भ्यां शूद्रो अजायत ॥१२।।


तर ब्राम्हण हे मुख, राज्यकर्ते क्षत्रिय त्याचे बाहू, वैश्य त्याच्या मांड्या व शूद्र त्याचे पाय अशी योजना करण्यात आली. 

(येथे चार वर्णांचा उल्लेख एकदाच ऋग्वेदात येतो). 


चन्द्रमा मनसो जातश्चक्षोः सूर्यो अजायत । मुखादिन्द्रश्चाग्निश्च प्राणाद्वायुरजायत ॥१३।।


त्याच्या मनापासून चंद्र, दोन्ही नेत्रांच्या तेजापासून सूर्य, मुखापासून इंद्र व अग्नी आणि त्याच्या श्वासातून वायूची निर्मिती झाली. 


नाभ्या आसीदन्तरिक्षं शीर्ष्णो द्यौः समवर्तत । पद्भ्यां भूमिर्दिशः श्रोत्रात्तथा लोकाँ अकल्पयन् ॥१४।।


त्याच्या नाभीपासून अंतरिक्ष, मस्तकापासून द्युलोक निर्माण झाला. त्याच्या पायांपासून भूमी, कानांपासून दिशा आणि इतर लोक उत्पन्न झाले. अशा प्रकारे संपूर्ण जगताची उत्पत्ती झाली. 


सप्तास्यासन्परिधयस्त्रिः सप्त समिधः कृताः । देवा यद्यज्ञं तन्वाना अबध्नन्पुरुषं पशुम् ॥१५।।


या यज्ञाच्या सात परिधी (यज्ञवेदीच्या पायऱ्या) व त्रिसप्त (२१) समिधा केल्या होत्या. आणि देवांनी यज्ञाला प्रारंभ करून या यज्ञवेदीजवळ (यूपाला ) यज्ञ पशु म्हणून या विराट पुरुषाला बांधले. 


यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् । ते ह नाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः ॥१६।।


अशा रीतीने यज्ञ योग्य पुरुषाद्वारे देवांनी यज्ञाद्वारे यजन केले आणि त्यातून निर्माण झालेल्या धर्माची प्रथम स्थापना केली व यज्ञमार्ग चालू केला, जेणेकरून स्वर्गाची प्राप्ती झाली. 


१६ ऋचांचे हे सूक्त परमेश्वराच्या विराट रूपाचे वर्णन करते तसेच ते सृष्टिनिर्मितीची वेदकालीन मानली जाणारी प्रक्रियादेखील उद्धृत करते. सृष्टिनिर्मितीचे कोडे सोडविण्याचा प्रयत्न करणारी जी काही सूक्ते वेद वाङ्मयात आहेत त्यामधील हा देखील एक प्रयत्न आहे. सांख्यांचे तत्त्वज्ञान देखील याच पायावर उभे आहे. तत्कालीन ज्ञात असलेल्या ज्ञानातून परम ईश सामंजवून घेण्याचा तसेच सृष्टीचे कोडे उलगडण्याचा हा एक प्रयत्न आहे. पंचमहाभूतांची निर्मिती कशी झाली असावी ? प्राणी कसे निर्माण झाले असावेत, वेद कसे निर्माण झाले असावेत ? सूर्य - चंद्र - श्वासासाठी आवश्यक असलेला वायू यांची निर्मिती कशी झाली आणि धर्माचा पाया घालून स्वर्गाचा मार्ग कसा प्रशस्त केला गेला असेल याची कल्पना या सूक्तांतून येते. 


रविवार, २ जुलै, २०२३

महाभारतातील व्यक्तिरेखा - डॉ विमल पवनीकर

 विजय प्रकाशन, प्रथमावृत्ती - १६ जून २००५, दुसरी सुधारित आवृत्ती - २१ ऑक्टोबर २०१४.  किंमत - रु ५००/-


महाभारतातील विविध व्यक्तिरेखांवर आजवर बरेच व्यक्तिचित्रण केले गेले आहे. व्यासांच्या लेखणीतून उतरलेल्या या महाकाव्यातील या व्यक्तिरेखांना इतक्या छटा आहेत कि यातील प्रत्येक व्यक्तीचे स्वभाव विशेष, गुवणत्ता व पराक्रम दाखविणारी स्वतंत्र पुस्तके देखील उपलब्ध आहेत. “महाभारतातील व्यक्तिरेखा” हे डॉ विमल पवनीकरांचे पुस्तक म्हणजे यातील १७ व्यक्तिरेखांचे वर्णन करणारे, नागपूरच्या तरुण भारत मध्ये ९० च्या दशकात प्रसिद्ध झालेल्या लेखांचे संकलन आहे. त्यामुळे यातील प्रत्येक व्यक्तिरेखेवरचे लेख वेगवेगळ्या वैशिष्ट्यांमध्ये विभागले गेलेले आहेत. उदा. कर्ण हि व्यक्तिरेखा वैकर्तन कर्ण, सूतपुत्र कर्ण, शापग्रस्त कर्ण , अधःपतित कर्ण, पराजित कर्ण, अनिर्वचनीय कर्ण व रणवीर कर्ण अश्या विविधांगाने आपल्यासमोर येतो व याचप्रमाणे इतर व्यक्तिरेखादेखील. 


महाभारतातील व्यक्तिरेखांचे वर्णन आपल्याला त्यांच्याविषयी महाभारतात विविध ठिकाणी आलेल्या प्रसंगावरून वाचायला मिळते. त्या त्या प्रसंगात त्या व्यक्तिरेखेचे विशेष पैलू उभारून येतात व लेखिका त्यावेळच्या समर्पक श्लोकांमधून आपल्याला ते पैलू  विषद करीत राहतात. श्लोक व त्याचा अर्थ, त्यावरील विवेचन यातून गुंफली जाणारी व्यक्तिरेखांची ही मालिका आपल्याला महाभारताचे वेगळेच गुणविशेष उलगडते. मात्र हे पुस्तक वाचण्यापूर्वी आपल्याला महाभारताच्या कथानकाची चांगली ओळख असणे आवश्यक आहे तरच यातील बारकावे आपल्याला उलगडतील. 


पुस्तकाच्या अखेरीस व्यासांच्या महाभारताने भारतीय परंपरेत जे मोलाचे कार्य करून ठेवले आहे त्याचा आढावा घेतलेला आहे. यात कालिदासाच्या रघुवंश, कुमारसंभव, अभिज्ञान शाकुन्तलम, विक्रमोर्वीरशियम (पुरुरवा व उर्वशीची कथा) इत्यादीतून महाभारताचे झालेले बीजारोपण, भट्टनारायणाचे वेणीसंहार, भासाचे ऊरूभंग, दूतवाक्यम, पंचरात्रम, दूतघटोत्कच, बालचरितम, कर्णभार यातून फुललेला कथाफुलोरा कसा महाभारतातूनच फुलला याचा उहापोह आहे. यातूनच भारवीने किरातार्जुनीयम, माघाने शिशुपालवध, श्रीहर्षाने नैषधीय चरितम यांसारखी संस्कृत महाकाव्य रचली याचाही उल्लेख येतो. प्रत्येक कवीने, कथाकाराने या महाकाव्यात काय शोधले? महाभारत आपल्या परंपरेत व जीवनशैलीत कसे मिसळून गेले याचाही आढावा आपल्याला यातून घेतलेला आढळतो. 


महाभारत सलग वाचताना आपल्याला या व्यक्तिरेखांचे गुणविशेष सलगपणे आपल्याला जाणवत नाहीत पण या पुस्तकातून ते कळल्याने आपण स्तिमित होऊन जातो. त्यामुळेच महाभारताबद्दल जिज्ञासा असणाऱ्यांनी हे पुस्तक एकदातरी वाचायला हवे. 



गुरुवार, २१ जुलै, २०२२

कृष्णाख्यान - महेश नाईक

भारतीय मनावर श्रीकृष्ण या नावाची मोहिनी गेली किमान पाच सहस्रके कायम आहे. प्रत्येकाचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असला तरी या सर्वांचे भारावलेपण हा त्यातील सामायिक दुवा आहे. कुणी त्याची भक्ती करते, तर कुणी त्यात राजकारणधुरंधर व्यक्तिमत्त्व शोधते. त्याच्या कार्याचा आवाका, त्याची निर्णयक्षमता इतकी विलक्षण आहे की, आपण चकित झाल्याशिवाय रहात नाही. आणि मग आज पाच हजार वर्षांनंतर जर आपली ही परिस्थिती असेल तर ज्या काळात तो जगला तो व त्याच्यानंतर लगतचा काळ यात तो दंतकथा बनून राहिला नसता तरच नवल.

त्याच्या कार्यकर्तृत्वावर चमत्कारांची आवरणे चढत गेली. वास्तविक पाहता त्याच्या कार्याला यातील कोणत्याही आवरणाची आवश्यकता नाही असे त्याचे कर्तृत्व निर्विवाद होते. भौतिक नियमांच्या चौकटीतच राहून त्याने त्याची अचाट कार्ये केली अन् त्याच्यावर प्रेम करणाऱ्या हजारो भक्तगणांनी त्याला ‘भगवंत बनविण्यासाठी’ ही भौतिक नियमांची आणि तर्कवादाची चौकट मोडून टाकली आणि त्याच्याकडून त्याने कदाचित कधीही न केलेली अचाट कामेदेखील करून घेतली!
कृष्णाख्यान कशासाठी ?
- कृष्णाचे मानवी रूप समजून घेण्यासाठी.
- चमत्कार विरहीत कृष्ण समजून घेण्यासाठी, कृष्ण चरित्रातील चमत्कारांची कारणमीमांसा जाणून घेण्यासाठी.
- मानवी पातळीवर महाभारत कसे घडले असेल हे कृष्ण-चरित्राद्वारे समजावून घेण्यासाठी.
- कृष्ण किती वर्षे जगाला? त्याच्या आयुष्यातील कोणत्या घटना त्याच्या वयाच्या कोणत्या वर्षी घडल्या? या प्रश्नांची उत्तरे सप्रमाण मिळविण्यासाठी.
- कृष्णाचे संपूर्ण चरित्र समजून घेण्यासाठी.
गेल्या पन्नास-साठ वर्षात अनेक नामवंतांनी कृष्णाचे हे भौतिक नियमांच्या चौकटीतील रूप मांडण्याचा प्रयत्न केला आहे. हे वाचताना मला यात पूर्णत्व आणण्यासाठी एका सलग, तरीपण संक्षिप्त कृष्ण-चरित्राची निकड भासू लागली. आणि म्हणूनच विविध ठिकाणी वाचलेल्या बारीकसारीक घटना, त्यामागचे तर्क, विचारमंथने मी सलग मांडून शब्दबद्ध करायचा प्रयत्न केला आहे. कृष्णाचे खरेखुरे स्वरूप जाणून घ्यायची माझ्यासारखी जिज्ञासा असणाऱ्या वाचकांना माझे हे ‘कृष्णाख्यान’ नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे.


गुरुवार, १७ फेब्रुवारी, २०२२

स्वयंभू - डॉ. पद्माकर विष्णु वर्तक

 प्रथमावृत्ती : १९७१, सहावी आवृत्ती : २००९ 


भीम या एका स्वयंभू पांडवावर सुमारे ५० वर्षांपूर्वी डॉ. प. वि. वर्तक यांनी लिहिलेले हे पुस्तक म्हणजे केवळ भीमावरील हे पहिले (व कदाचित एकमेव)  पुस्तक असावे. १९७१ साली लिहिलेल्या या पुस्तकात त्यांनी १९८८ साली तिसरी आवृत्ती काढताना एक महत्वाची भर घातली ती म्हणजे महाभारत युद्धाचा कालखंड ठरविण्याची. महाभारतातील विविध पर्वांत आलेल्या खगोलशास्त्रीय श्लोकांचा आधार घेत त्यांनी महाभारत युद्ध इ. स. पूर्व ५५६१ साली झाले असे प्रतिपादिले आणि एका वेगळ्या चर्चेला देखील तोंड फोडले. त्यांचे हेच वर्ष प्रमाण मानत  डॉ. निलेश ओक यांनी पुढे त्याचा वेगळा अभ्यास केला व स्वतःचे वेगळे संदर्भ देत १६ ऑक्टो. ५५६१ हि युद्धाच्या पहिल्या दिवसाची तारीख असल्याचे जाहीर केले. 


भीम स्वयंभूच होता हे प्रतिपादताना श्री वर्तक यांनी भीमाची पुराणकथाकारानी व कीर्तनकारांनी रंगविलेली आडदांड , खादाड, अविचारी,शीघ्रकोपी, व पटकन भावनाविवश होऊन निर्णय घेणारा पांडव, अशी प्रतिमा कशी चुकीची आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी त्यांनी भीमाबद्दलची महाभारतातील प्रतिमा २ भागांमध्ये विभागली आहे. पहिला भाग हा भीम हा एक उपेक्षित पण विद्वान मुत्सद्दी असल्याचे पटविणारा तर दुसरा भाग भीम कसा मूर्तिमंत पराक्रमाचे प्रतीक होता हे दर्शविणारा. आणि या दोन्ही प्रकारातून त्याच्या अजोड बुद्धिमत्तेने आणि अतुलनीय पराक्रमामुळे भीम महाभारताचा नायक कसा ठरतो हे वाचकांना पटविण्यात श्री प वि वर्तक यशस्वी झाले आहेत. 


पांडवांच्या बालपणापासूनच्या विविध प्रसंगातील भीमाच्या मुत्सद्दीपणाची बरीच उदाहरणे वर्तकांनी घेतली आहेत. लाक्षागृह प्रसंगातील त्याची सावधानता, त्यातून बाहेर पडल्यावर एकट्या भीमाने चौकसपणे आपल्या मातेचा व भावंडांचा केलेला सांभाळ, हिडिंब वध , द्रौपदी स्वयंवराच्या वेळी त्याने केलेली अर्जुनाची पाठराखण,पुढे जरासंधवध, राजसूय यज्ञातील दिग्विजय प्रसंगी भीमाचा पराक्रम इ अनेक घटनाक्रमातून भीमाची चौकसता व पराक्रम सिद्ध होतोच पण द्रौपदी वस्रहरणाच्या प्रसंगात द्रौपदीची लाज कुणामुळे राखली गेलू असेल तर ती दूरस्थ कृष्णामुळे नसून राजसभेत दास म्हणून उभ्या असलेल्या पण संतप्त झालेल्या भीममुळेच. या घटनेचे साद्यन्त वर्णन करताना द्रौपदी वस्रहरणाचा प्रसंग प्रत्यक्ष घडलाच नसल्याचे भांडारकर प्रतीतील सुमारे ३० प्रसंगातून कसे समजते हे वाचकांच्या लक्षात आणून दिले आहे. 


धर्माच्या स्वरूपावर देखील भीमानेच वेळोवेळी युधिष्ठिराशी वाद घातला आहे. सभापर्वात, द्युतामुळे आपल्यावर ओढविलेल्या प्रसंगामुळे, भीम वनपर्वात युधिष्ठिराला दोष देतानाही दिसतो. जो धर्म सुहृदांच्या आणि आपल्या अपकर्षास कारण ठरतो तो म्हणजे दुःखाचे अथवा अधर्माचेच बीज आहे याची जाणीव युधिष्ठिराला करून देताना तो महान तत्ववेत्ताच वाटतो. पण याच वनवासात भीम प्रगल्भही होत गेला आहे. दुर्योधनासारखा आपला शत्रू आपल्याकडून द्युतात हिसकावून आपल्या संपत्तीवर स्वतःचे राज्य व प्रभाव वाढवितो आहे याची त्याला जाणीव आहे. 


वनात पांडवांवर येणाऱ्या संकटाचे निराकरण प्रसंगी भीमाने एकट्याने केले आहे. किर्मीर व जटासुराचा वध हि त्याचीच उदाहरणे. द्रौपदीला पळवून नेऊ इच्छिणाऱ्या जयद्रथाला शासन भीममुळेच सहजशक्य झाले. वनवासात द्रौपदीची सर्वात जास्त काळजी कोणी वाहिली असेल तर ती भीमानेच. तिचे सगळे हट्ट देखील त्यानेच पुरविले आहेत. पुढे अज्ञातवासात असताना प्रथम किचक व नंतर अनुकिचकांच्या तावडीतून द्रौपदीला सोडविले ते देखील भीमानेच. 


असा वैयक्तिक पराक्रम करणारा भीम युद्धभूमीवरील पराक्रमी सेनानी म्हणून झळाळून उठतो. राजसूय यज्ञाकरिता जेव्हा दिग्विजयाची वेळ आली तेव्हा जरासंधाच्या वधानंतर त्याने पूर्व दिशेकडील राजे पादाक्रांत केले. यात अंगदेशाचा तत्कालीन राजा कर्ण देखील होता. कर्णाचा असाच पराभव त्याने महाभारत युद्धात देखील केलेला आढळतो. या महाभारत युद्धात दुर्योधनाचे सर्व बंधू देखील भीमानेच मारले. पण यातील विकर्णाला मारल्यावर मात्र तो हळवा  झाला कारण याच विकर्णाने भरसभेत द्रौपदीचा अपमान होत असताना त्याविरुद्ध बोलण्याचे धाडस केले होते. दुःशासनाला मारताना मात्र त्याने आपले क्रौर्य पुरेपूर प्रकट केले. भीमाच्या या युद्धातील पराक्रमाची वेगवेगळ्या युद्ध पर्वात येणारी वर्णने श्री वर्तकांनी वेचून शब्दबद्ध केली आहेत. 


महाभारत युद्धाचा कालखंड : 


पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीत जोडलेल्या भागात श्री. प. वि. वर्तक यांनी महाभारत युद्धाच्या संभाव्य कालखंडाचा विस्तृत आढावा घेतला आहे. यात विविध पुराणात उपलब्ध असलेल्या राजवंशांच्या वंशावळीपासून महाभारतात उपलब्ध असलेल्या महत्वाच्या खगोल निरीक्षणात्मक श्लोकांचे विवेचन आहे. सुप्रसिद्ध अरुंधती वसिष्ठ प्रमेयाला यात श्री वर्तकांनी पहिल्यांदा ओझरता स्पर्श केल्याचे आपल्याला आढळते. रोहिणी शकटभेद, विविध ग्रहांचे वक्री होण्याचे संदर्भ, तैत्तिरीय ब्राह्मणातील काल , वेदकाल , उत्खनन शास्त्र, या साऱ्यांचा आढावा घेत त्यांनी इ.स. पूर्व ५५६१ हे वर्ष सुचविले आहे. त्यामुळे या कालगणनेत रस असणाऱ्या वाचकांनी या पुस्तकातील हि तोंडओळख तरी नक्की वाचायला हवी. अलीकडच्या काळात यावर बरेच संशोधन होऊन वेगवेगळे कालखंड पुढे केले गेले आहेत व यातदेखील श्री वर्तकांचे हे कार्य निश्चितच पायाभूत ठरणारे आहे यात शंकाच नाही. 


शुक्रवार, ४ फेब्रुवारी, २०२२

महाभारतातील स्त्रिया भाग - १ - डॉ. आ. ह. साळुंखे

 प्रकाशक - सुगावा प्रकाशन, पुणे ३० .....  प्रथमावृत्ती - १९९३, चौथी आवृत्ती - २००६


महाभारत कथेत स्त्रियांना अनन्यसाधारण महत्व आहे. किंबहुना महाभारताचे कथानक घडते त्याच्या अनेक कारणांपैकी  एक मुळी द्रौपदीच्या अपमानाचा सूड हे आहे. पण त्याच बरोबर या स्त्रियांना स्वतःचे तेज , ठोस विचारसरणी , ओजस्विता आहे, व त्यामुळे महाभारतातील काही स्त्रियांची रेखाटने उठून दिसतात. 


महाभारतातील उपाख्यानांमध्येही काही जनमानसात रूढ झालेल्या तर काही तुलनेने अप्रसिद्ध कथानकांद्वारे आपल्याला विविध स्त्रियांची ओळख होते. डॉ. आ. ह. साळुंखे यांनी “महाभारतातील स्त्रिया - भाग १” या पुस्तकातून यातील काही निवडक स्त्रियांची ओळख आपल्याला करून दिली आहे. पण हि ओळख केवळ त्या स्त्रीच्या स्वभावाची अथवा महाभारतातील स्त्रीच्या संदर्भातील नसून तत्कालीन समाज जीवनाचे प्रतिबिंब या शब्दचित्रामधून रेखाटले आहे.  महाभारतात येणारी एखादी कथा काय आशय दर्शविते व त्यातून स्त्री चे अथवा समाजमनाचे कोणते रूप आपण लक्षात घ्यावे याचे उत्तम विश्लेषण डॉ साळुंखे करतात. 


प्रास्ताविकात तुलसीविवाह प्रथा जालंधर या असुराची पत्नी वृंदा एक श्रेष्ठ पतिव्रता होती. जालंधरच्या वधासाठी विष्णूला प्रथम वृंदेच्या पातिव्रत्यभंग करणे आवश्यक ठरते यासाठी तो जालंधराचे रूप घेऊन वृंदेला फसवितो. मग वृंदा - विष्णू हि तुलसीविवाहाची प्रथा कशी चुकीची आहे हे डॉ साळुंखे आपल्याला पटवून देतात व यातूनच आपल्याला या पुस्तकात काय वाचायला मिळेल याची चुणूक दिसते. यात पुढे मग आपल्याला सावित्री, माधवी, शकुंतला, अंबा, द्रौपदी आणि भंगाश्वन राजाचे स्त्रीत्व या कथांमागील वेगळाच पैलू उलगडतो. 


सावित्रीची कथा तशी आपल्या सर्वांच्याच परिचयाची आहे. वटसावित्रीच्या व्रताच्या निमित्ताने ती समाजमनावर देखील रुजविली गेली आहे. पण डॉ आ ह साळुंखे मूळ महाभारतातील उपाख्यानाचे बारकावे सांगत आपल्याला वेगळा विचार करायला भाग पाडतात. राजकन्या असलेल्या सुंदर सावित्रीचा विवाह का होत नसावा ? तिला स्वतःलाच वर संशोधनासाठी का बाहेर पडावे लागले असेल ? त्यातही तिने निवडलेला वर जंगलात वास्तव्यास असणारा परागंदा झालेल्या राजाचा राजपुत्रच का असावा ? वनात राहणाऱ्या अल्पायुषी असा शाप असणाऱ्या सत्यवानाशीच तिची लग्नगाठ अशी का बांधलेली असावी याची कारणमिमांसा या कथेतीलच काही मुद्द्यांद्वारे डॉ साळुंखे आपल्यासमोर मांडतात. सत्यवानाचे अल्पजीवीत्व का असावे ? यामधर्माकडून आपली पतीचे प्राण परत मिळविणारी सावित्री आपल्या पित्यालाही १०० पुत्र व्हावेत असा वर का बरे मागून घेत असावी याचे विवेचन डॉ साळुंखे करतात. 


यानंतर ययातिकन्या माधवीची विलक्षण कथा आहे. हट्टीपणा कसा घटक ठरू शकतो हे दुर्योधनाला पटविण्यासाठी उद्योगपर्वात (अ. १०४ ते १२१) हे उपाख्यान येते. विश्वामित्राला गुरुदक्षिणा देण्यासाठी आवश्यकी असणारे ८०० श्यामकर्णी अश्व मागण्यासाठी गालव मुनी ययाती राजाकडे येतात. पण आता आपण पूर्वीप्रमाणे श्रीमंत राहिलेलो नाही त्यामुळे इतके अश्व देऊ शकत नाही, त्या ऐवजी मी माझी कन्या माधवी तुम्हाला देतो, एखाद्या राजाला तिला देऊन तुम्ही ते ८०० अश्व प्राप्त करा असे ययाती गालवांना सांगतो. पुढे प्रत्येकी २०० अश्वांच्या मोबदल्यात ३ राजांशी या माधवीच्या १ वर्षाच्या करारावर विवाह लावत गालव मुनी ६०० अश्व प्राप्त करतात पण ठाहून जास्त अश्व न मिळाल्याने माधवीला घेऊन ते विश्वामित्रांकडे जातात. त्यावर हिला आधीच माझ्याकडे आणले असतेस तर ८०० अश्वांची आवश्यकता नव्हती असे प्रतिपादन विश्वामित्र करतात. तत्कालीन समाजव्यवस्थेतील स्त्रीच्या स्थानाचे, अवस्थेचे विवरण यावर डॉ साळुंखे करतात. 


सुप्रसिद्ध कण्वकन्या शकुंतलेची कथाही काहीशी याच धाटणीची. मात्र शंतनू राजाने आपल्या पुत्रासह आपला स्वीकार केलाच पाहिजे हे ठणकावणारी  शकुंतला डॉ साळुंखे व्यवस्थित उभी करतात व शंतनूची बाजू लंगडी पडू नये यासाठी याकरिता नंतर पुराणकारांनी महाभारतात त्याच्या शापामुळे झालेली विस्मृतीची कथा घुसविले आहे. यात मग कोळ्याला सापडलेल्या आगनाथाची कथा येते. मूळ महाभारतात मात्र या कथेला स्थान नाही. मूळ शकुंतलाच कणखर आहे. 


अंबा  व द्रौपदी या महाभारतातील मूळ कथेतील नायिका. यातले अंबेचे भीष्मांविषयक सुडाचे प्रयोजन शिखंडीला कथेत जोडण्यासाठी कसे केले गेले हे आंबा प्रकरणात डॉ साळुंखे आपल्याला समजावतात. 


द्रौपदी कथेवरही लेखक असा वेगळा प्रकाश टाकतात. ज्या अर्जुनाने तिला पणात जिंकली त्याच्याच वाट्याला ती सर्वात कमी आली. अर्जुनाला १२ वर्षे तिचा विरह सहन करावा लागला. असे असून देखील तिने अर्जुनाच्या वाजून इंटर्नशी पक्षपात केल्यामुळेच तिला सर्वप्रथम मृत्यू आला असे युधिष्ठीर म्हणतो. पांचालीचा पाचांशी विवाह हा पांडवांच्या तिच्याविषयीच्या लालसेतून झाला. पुढे तो त्यांच्या एकीसही कारणीभूत ठरला हे खरं असलं तरी त्याची वैधता पटविण्यासाठी महाभारतकारानी बऱ्याच कसरती केल्या आहेत. 


यातील शेवटची कथा विलक्षण आहे व ती आहे एकाच जन्मी प्रथम पुरुष व नंतर स्त्रीरूप पावलेल्या भंगाश्वन नावाच्या राजाची. तत्कालीन समाजाच्या मानसशास्त्र व समाजशास्त्र यांचा वेध घेणारी हि  कथा महाभारताच्या अनुशासन पर्वात येते. या कथेच्या अनुषंगाने आपल्याला महाभारतकारांच्या अचाट कल्पनाशक्तीची कल्पना येते तर याच कथेला उजेडात आणत डॉ साळुंखेंनी स्त्रीत्व कसं श्रेष्ठ याचा विचार करायला लावला आहे. 


महाभारतकालीन स्त्रीत्वाचा वेध घेणारे डॉ आ ह साळुंखे यांचे हे पहिले पुस्तक प्रत्येक जिज्ञासूने वाचायलाच हवे असे आहे.


मंगळवार, २५ जानेवारी, २०२२

महाभारत, एक मुक्त चिंतन - प्रेमा कंटक

 प्रकाशक - महाराष्ट्र ग्रंथ भांडार , कोल्हापूर .....  प्रथमावृत्ती - १९६७ 

महाभारतातील विविध प्रसंगाचे विवेचन , त्याची चिकित्सा व त्यामागील शक्याशक्यता इत्यादींचे विवेचन सुमारे ५५ - ६० वर्षांपूर्वी महाभारताची भांडारकरप्रणित चिकित्सक  प्रत उपलब्ध झाल्यावर अनेकांनी केले आहे. यातील बरेच साहित्य त्या काळात पुस्तक रूपात उपलब्ध होत होते. पण हि पुस्तके आता दुर्मिळ या सदरात गणली जाऊ लागली आहेत. लेखिका प्रेमा कंटक यांचे महाभारत - एक मुक्त चिंतन , हे देखील याच दुर्मिळ प्रकारातील एक वेगळे पुस्तक. महाभारताचे वेगळ्या अंगानी चिंतन करत परामर्श घेणारे. तत्कालीन इतरांनी लक्षात न घेतलेले दुवे, संकल्पना मांडणारे व त्याचे वर्गीकरण करत महाभारताची कथा उलगडून दाखविणारे. या पुस्तकाला विनोबाजींनी प्रस्तावना देखील आहे. 

पुस्तकाची विभागणी ५ मुख्य प्रकरणांमध्ये केली आहे. हि ५ प्रकरणे महाभारताला वेगळ्या अंगाने स्पर्श करतात. यातील “कवी आणि ग्रंथ” या प्रकरणात नावाप्रमाणेच या महाकाव्याच्या स्वरूपाचा उहापोह आहे. महाभारताच्या रचनेत कुणाकुणाच्या कसकसा हातभार लागला, व्यासांपासून हा वारसा पुढे कसा सरकत गेला, त्यात उपाख्यानाची भर कशी पडत गेली याचे विवेचन आहे. 

 पुढचं प्रकरण आहे “विसंगती आणि असंभव”, यात महाभारतात आढळणाऱ्या पुनरुक्ति , अतिशयोक्ति , प्रक्षिप्तता याबद्दलची चर्चा आहे. याबद्दलची विविध उदाहरणे देताना लेखिकेने महाभारतातील अनेक विसंगती दाखविण्याचा प्रयत्न केला  आहे. याचबरोबर हे चमत्कार कसे प्रक्षिप्त असू शकतात यावर भाष्य केले आहे. उदा. चेदिराज शिशुपालाची जन्मकथा व त्याला असणारे जास्तीचे २ हात कृष्ण बलरामांच्या  दर्शनानंतर आपोआप गाळून पडल्याचा उल्लेख. यावेळी जर कृष्ण लहानग्या शिशुपालाला मांडीवर घेण्याएवढा मोठं होता तर रुक्मिणीस्वयंवरात तो त्याचा प्रतिस्पर्धी कसा ठरेल ? त्यामुळे शिशुपालाचे अपराध पोटात घालण्याचे वचन जर कृष्णाने आपल्या आत्याला दिलेच असेल तर ते इतर कोणत्या तरी प्रसंगी दोघेही व्यवस्थित मोठे ( व समवयस्क ) असताना दिले असले पाहिजे. 

अशीच एक विसंगती द्रोणाचार्यांच्या वयाबद्दलही आहे. द्रोणांचा वाढ झाल्यावरीलच्या वर्णनात 

“आकर्ण पलित: श्यामीवयसाशीती पंचक: ।।६०।।"

म्हणजेच ..... आचार्यांच्या शरीराचा वर्ण सावळा होता. कानापर्यंत त्यांचे केस शुभ्र झाले होते. वय ४०० (अशीती पंचक = ऐशीं पंचके = ४००) होते. 

महाभारतातील इतर योद्ध्यांच्या वयाच्या अंदाजांशी (अगदी भीष्मांच्याही ) हे विसंगत ठरते. 

यापुढील २ प्रकाराने विस्तृत आहेत. यातील “दैव कि पुरुषार्थ” या प्रकरणात महाभारत कथा सारांशाने येते व विविध प्रसंगांतील बारकावे उलगडले जातात. महाभारत कथेवरील मुख्य टिपणे या प्रकरणात आहेत. प्रत्येक घटनेमागचे विश्लेषण व लेखिकेची मतेदेखील आहेत.  हे प्रकरण सुमारे ७८ पानांचे आहे. 

यानंतरचे "सूत्रधार" हे सुमारे ८६ पृष्ठांचे प्रकरण संपूर्णपणे कृष्णाला वाहिलेले आहे. त्याचे बालपण विविध पुराणातून येते  पण त्यानंतर महाभारतातील कृष्ण उलगडला आहे. महाभारतातील त्याचे विशेष स्थान , त्याने विविध प्रसंगी घेतातलेले निर्णय , त्याचे पांडव, कुंती, द्रौपदी, विदुर यांच्याशी असणारे संबंध कधी व का जुळून आले असावेत याचा विचार.  कृष्ण द्रौपदी नात्यातील खरेपणा व त्यावर रचली गेली नंतरच्या काळातील नाट्यमय वर्णने, याचबरोबर विविध प्रसंगातील कृष्णाचा धोरणीपणा लेखिकेने वर्णिला आहे. कृष्णाची वैगुण्ये जशी लेखिका आपल्याला दाखवते तसेच  काही प्रसंगती त्याचा अतिविशेष मुत्सद्दीपणा देखील. उदा. युधिष्ठीर व अर्जुनातील कर्णवधावरून रंगलेले भांडण व कृष्णाने समाधानपूर्वक केलेले दोघांचेही सांत्वन त्याचा मुत्सद्दीपणा व समयसूचकता दर्शवितो. 

कृष्णाने पांडवांची जबाबदारी आपल्या शिरावर घेतली होती व ती शेवटपर्यंत निभावली. अगदी युद्ध संपल्यावर देखील. अशा या असामान्य व्यक्तीचा अंत मात्र एखाद्या सामान्य व्यक्तीप्रमाणेच झाला याचेही वर्णन या भागात येते. 

शेवटचे प्रकरण “असक्तबुद्धी: सर्वत्र”. हे प्रकरण म्हणजे ग्रंथ व धर्म या बद्दलची चर्चा आहे. महाभारत, वेद , पुराणे यातील धर्माचे स्वरूप आणि धर्मशास्त्राचा विकास कसा झाला याचे विवेचन लेखिकेने यात केले आहे. 

एकंदरीतच महाभारतावर वेगळा प्रकाश टाकणारे हे पुस्तक  सध्या सहज उपलब्ध नाही. पुणे नगर वाचनालयात उपलब्ध असलेली एक प्रत माझे मित्र श्री संजय संती, यांनी मला वाचनासाठी उपलब्ध करून दिली यासाठी मी त्यांचा आभारी आहे. महाभारताच्या जिज्ञासू वाचकाला ते नक्कीच आवडेल. 


गुरुवार, ६ मे, २०२१

या सम हा - डॉ.सदानंद मोरे

 योगेश्वर कृष्णाचे वैचारिक चरित्र, 

डॉ सदानंद मोरे हे पुणे विद्यापीठातील तत्वज्ञानाचे प्राध्यापक व भारतीय संस्कृती आणि इतिहास हा त्यांचा अभ्यासाचा विषय. तो हाताळतानाच त्यांचा संबंध महाभारताबरोबरच भगवतगीता व कृष्णचरित्र असलेल्या पुराणांशी आला.त्यातही त्यांना वेगवेगळ्या प्रकारचा कृष्ण आढळला व त्यांचाही कृष्णचरित्राचा एक वेगळा शोध सुरु झाला आणि तो होता विचारवंत व तत्वज्ञानी  कृष्णाचा. याचीच परिणती एका शोधनिबंधात झाली तो म्हणजे Krishna : The Man and His Mission. हाच शोधनिबंध श्रीमती पूर्णिमा लिखिते यांनी “या सम हा” या नावाने मराठीत पुस्तकरूपाने आणला आहे. 

या शोधनिबंधाचे स्वरूप अर्थातच कृष्णाकडे ईश्वरी अवतार म्हणून न पाहता इहलोकातील मानव म्हणून पाहिले तर कसे दिसेल हे आहे. यात कृष्णचरित्राचे तत्वज्ञान ठासून भरले आहे. शोधनिबंध असल्याने सुरवातीचे प्रकरण नेमकी समस्या (अथवा शोधनिबंधकारासमोरील प्रश्न) व पद्धत (प्रश्नाचं अथवा समस्येचं निराकरण करण्याची) याचा उहापोह आहे. यासाठी त्यांनी पाश्चात्य तसेच भारतीय पूर्वसुरींच्या अभ्यासाचा आढावा घेतला असून देवावताराचे प्रारूप आपल्यासाठी केवळ निरुपयोगीच नाही तर कसे धोकादायक ठरू शकेल ते दाखविले आहे. यानंतर यात बंगालचा चैतन्य संप्रदाय व महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय या कृष्णभक्त संप्रदायांची तुलना आहे. या संप्रदायांची साहित्यनिर्मिती व त्यांचा परंपरांवरील ठसा यांचा आढावाही आहे. 

“कृष्णाच्या कर्तृत्वाची रूपरेषा” या प्रकरणामध्ये कृष्ण चरित्रातील ठळक गोष्टी येतात व त्यांचे विश्लेषण देखील येते.  कृष्णाचा कंस वध, त्याचे नातेसंबंध, विवाहसंबंध, महत्त्वाच्या घटना व त्यात त्याची भूमिका, एकलव्या बद्दलची माहिती, अक्रूर स्वभावाचे बारकावे दर्शविणारी स्यमंतक मण्याची कथा, वासुदेवत्वाचा प्रश्न, इत्यादी अनेक मुद्द्यांना डॉक्टर मोरे स्पर्श करतात व त्यामागची प्रेरणा, तत्वज्ञान, विचारसरणी समजावून सांगतात.  

यात आपल्याला गणराज्य व राजसत्ता यातील संघर्षाची बीजे सापडतात व यादव संघात माजलेली दुफळी कळते. त्यातून कृष्ण या लोकनेत्याचा उदय कसा झाला असावा हे आपल्या लक्षात येते. हे राजकीय प्रश्न सोडवताना कृष्णाची प्रगल्भता बहरत जाते व त्याचे सामाजिक स्थान, नेतृत्वगुण, हे देखील उभारून वर येतात.  कृष्णाचे विवाह,  त्यामागचे हेतू , आपल्याला स्पष्ट होत जातात.  कृष्णशिष्टाईच्या वेळचे योगेश्वर दर्शन म्हणजे त्याच्या मुत्सद्देगिरीचा परमोच्च बिंदू.  ज्याने युद्धाचा सर्व दोष कौरवांच्या पारड्यात टाकण्यात व सहानुभूतीचे जनमत पांडवांच्या बाजूने वळविण्यात कृष्ण कमालीचा यशस्वी ठरला. 

या पुस्तकाचे स्वरूप कृष्णाचे तत्त्वज्ञान समजून घेण्याचे असल्यामुळे दैव व पुरुषकार,  कर्मांचे समर्थन - गरज आणि आवश्यकता,  अर्जुनाचा प्रश्न,  धर्म रहस्य,  नीती-प्राधान्य वाद,  इत्यादी विविध प्रकरणातून कृष्णाच्या तात्विक बैठकीचे पैलू डॉक्टर मोरे यांनी व्यवस्थित उलगडले आहेत. यातील योग व धर्म यांचे विवेचन तर केवळ अप्रतिम आहे.  

असे असले तरी पुस्तक वाचायला व समजून घ्यायला बरेच अवजड असल्याने कृष्ण अथवा महाभारताच्या सर्वसामान्य वाचकाला ते सहज पचनी पडायला कठीण जाते.  पण हे पुस्तक म्हणजे एक शोधनिबंध आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.  त्या दृष्टीने आपल्याला त्याचे वेगळेपण आणि महत्त्व लक्षात येईल. 


गुरुवार, २९ एप्रिल, २०२१

धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे - विश्वास दांडेकर

 प्रथमावृत्ती - डिसेंबर २००६, दुसरी आवृत्ती - २०१४.

मला कृष्ण कुठे सापडेल? हा मला बरेच दिवस पडलेला प्रश्न होता.  खराखुरा कृष्ण, देवपणाची पुटे  न चढलेला कृष्ण, राजकारण धुरंधर कृष्ण, महाभारतातील पांडव सखा, अर्जुनाचा सखा. असा कृष्ण मला तुकड्या-तुकड्यामध्ये व्यासांचे शिल्प, युगांत, व्यासपर्व मध्ये सापडत होता, पण त्यात हवी तशी सलगता नव्हती.  "युगंधर" मधला भगवान श्रीकृष्ण सुखावणारा असला तरी सर्वस्वी पटणारा नव्हता.  त्यामुळेच ज्या कृष्णाला मी शोधत होतो तो थोड्याफार प्रमाणात मला सापडला तो श्री विश्वास दांडेकर यांच्या धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे मध्ये. 

महाभारताच्या कथानकावर बेतलेले हे पुस्तक आपल्याला महाभारताला स्पर्श करत कृष्णचरित्र उलगडताना आढळते.  कृष्ण जन्मापूर्वीची गोकुळ व मथुरेतील यादवांची स्थिती,  गणराज्य व राजेशाही यातील सूक्ष्म फरक, आणि त्याच्या पार्श्वभूमीवर कंस जरासंध द्वयीच्या राजेशाहीची स्थापना, याने या पुस्तकाची सुरुवात होते.  आणि आपल्याला कृष्णजन्म व त्यानंतर काय काय व कसे कसे घडले याची माहिती देते.  मग अशाच प्रकारे आपल्या पुढे येतो तो कुरु वंशाचा संक्षिप्त इतिहास आणि त्यांच्यातील दुहीच्या बीजांची कारणे.  छोट्या-मोठ्या घटनांचा उल्लेख करत पण त्यातील वर्णने टाळत आपल्याला मग पांडव व कृष्ण कसे व का एकत्र आले हे अगदी सहजपणे उकलते. 

त्यानंतरच्या घटना या कृष्णाच्या पांडवांबरोबरच मैत्री नंतरच्या आहेत.  ज्या सुरू होतात द्रौपदीस्वयंवराबरोबर जेथे कृष्ण प्रथम महाभारतात येतो.  त्याआधीच्या घटना हरिवंश अथवा भागवत पुराणातून आपल्या समोर येतात.  कृष्ण पांडवांबरोबर आल्यानंतर राज्य वाटणी, खांडववन दहन, इंद्रप्रस्था ची स्थापना, जरासंध वध, राजसूय यज्ञ व यावेळी कृष्णाने केलेला शिशुपालवध या सार्‍या घटनांची कारणमीमांसा आपल्याला सहज उलगडत जाते. 

मग येतो द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग दोन विस्तृत प्रकरणातून आपल्याला या प्रसंगाच्या वेळी ते द्यूत  का व कसे घडले असावे? आणि वस्त्रहरण हि घटना प्रत्यक्षात का घडलेली नसावी ? हे समजावून दिले आहे. यात द्यूत, अक्षविद्या आणि त्यासाठी आवश्यक असणारे कौशल्य, या सार्‍यांची फोड आहे व तसेच वस्त्रहरण प्रसंगात पर्यंतच्या व नंतरच्या घटना उकलून दाखविलेल्या  आहेत 

यानंतरचा कृष्ण येतो तो शिष्टाई प्रसंगीचा. या प्रसंगात श्रीकृष्णाच्या कौशल्याची कसोटी लागते व त्यात तो स्वतःच्या संरक्षणाची संपूर्ण व्यवस्था स्वतःच  करत, दुर्योधन, दुशासन, कर्ण व शकुनी या चौकडीचा धुव्वा उडवत, युद्धाचा सर्व दोष कौरवांवर टाकत,  आपल्या मनाप्रमाणे युद्ध ठरवतो व कृष्णशिष्टाई फिस्कटली, असे दाखवत नंतर कर्णाला  त्याचं जन्म रहस्य उघड करत, त्यावर मानसिक आघात देखील करतो

याच पुस्तकाच्या परिशिष्टामध्ये या साऱ्या घटनांची सांस्कृतिक पार्श्वभूमी व संदर्भ आहेत जे या पुस्तकाला परिपूर्ण करतात.  व म्हणूनच तुम्हाला जर महाभारत कथेची जाण असेल व महाभारतातल्या कृष्णाचा परिचय करून घ्यायचा असेल तर हे पुस्तक वाचायलाच हवे.  अर्थातच या एकाच पुस्तकात सामावण्या एवढा कृष्ण लहान नाही.  त्याला आणखी शोधायचा असेल तर तो हरीवंश, भागवत पुराण,बाळशास्त्री हरदास यांची व्याख्याने, अशा विविध ठिकाणी शोधायला हवा तेव्हा त्याचे विखुरलेले वेगवेगळे अंश सापडतील. 


शुक्रवार, २३ एप्रिल, २०२१

महाभारत एक सूडाचा प्रवास - दाजी पणशीकर

 प्रथमावृत्ती  १९७७ , नववी आवृत्ती - नोव्हेंबर २०१९


महाभारताच्या प्रत्येक अभ्यासकाला ते वेगवेगळे गवसलं.  कोणी त्यात व्यक्तिदर्शन शोधलं, तर कोणी त्यातील पात्रांच्या तोंडून संपूर्ण कथा कशी असेल ते वदविले. हे करताना त्यातून कृष्ण, कर्ण, दुर्योधन, अर्जुन यांसारखे अनेक महानायक पण तयार केले.  महाभारताचा विविध अंगाने अर्थ लावायचा प्रयत्न विविध लेखकांनी केला.  दाजी पणशीकर यांचा या पुस्तकातील प्रयत्न हा असाच एक “सूड” हि  वेगळी मध्यवर्ती संकल्पना उलगडण्याचा प्रयत्न होता व तो कमालीचा यशस्वी झालाय. 

१९७७ साली  प्रथम प्रसिद्ध झालेल्या महाभारत - एक सूडाचा प्रवास, या दाजी पणशीकर यांच्या पुस्तकाला नरहर कुरुंदकर यांची विस्तृत प्रस्तावना आहे.  हीच प्रस्तावना पुढे "व्यासांचे शिल्प" या नरहर कुरुंदकरांच्या लेखांचं / प्रस्तावनांचे संकलन असलेल्या पुस्तकात देखील संकलित केली आहे. 

महाभारत घडण्यास कारण ठरलेल्या क्रोधातून जन्मलेल्या सूड या संकल्पनेभोवती  या पुस्तकाचा विषय उलगडला जातो.  याची सुरुवात होते ते परशुरामांचा क्रोध व सूड  उलगडून.  आणि महाभारताची सुरुवात पणशीकर यांच्या मते होते ते अंबेच्या प्रतिशोधाच्या धुमसणाऱ्या आगीतून. काशीराजाच्या अंबा, अंबिका व अंबालिका या तीन कन्यांच्या स्वयंवरासाठी भीष्म पोहोचतात ते राजकुमार विचित्रविर्यासाठी.  आणि या पळवून आणलेल्या मुलींपैकी अंबा जेव्हा आपले शाल्व  राजावर प्रेम असल्याचे हस्तिनापुरात त्यांना सांगते, तेव्हा ते तिला सन्मानाने शाल्वाकडे परत देखील पाठवतात.  पण दुसऱ्याने पळवलेली मुलगी, म्हणून शाल्व तिला स्वीकारायला नकार देतो.  प्रतिज्ञाबद्ध भीष्मही  तिला स्वीकारत नाहीत आणि मग संतप्त अंबा याचा सूड म्हणून भीष्मांच्या विनाशासाठी विविध उपाय योजते.  अगदी परशुरामांना ही भरीस  घालते पण शेवटी तिचा निरुपाय होतो आणि ती अग्नीसमर्पण करते तेच भीष्मनाशासाठी पुनर्जन्म घेण्याच्या इच्छेने.  सुडाची ही साखळी व्यवस्थितपणे मांडण्यासाठी पणशीकरांनी या पुस्तकातील आठ प्रकरणे वापरली आहेत. 

द्रुपद व द्रोण यांच्यातील कटुतेचा उद्रेक हि सुडाची अजून एक साखळी.  द्रुपदाला बालमित्र म्हणून भेटायला गेलेल्या द्रोणाचा, राजा द्रुपद अपमान करतो, आणि द्रोण मग सूडाच्या भावनेने पेटून उठतात.  त्यांच्या पुढच्या सर्व क्रिया, त्यांचे कुरू दरबारात जाणे,  राजपुत्रांना शिकवणे, त्यांच्याकडून द्रुपदाला बंदी बनवून आणण्याची गुरुदक्षिणा मागणे, हे  सारे काही द्रुपदाचा सुड घेण्यासाठी.  आणि तो घेतला गेल्यावर द्रुपद सुडाने पेटून उठतो तो द्रोणांना संपविण्यासाठी  आणि मग दुसरे सूडचक्र सुरू करतो.  ते मग दृष्टद्युम्न,  द्रौपदी यांना जन्माला घालण्यापासून ते अंतिम युद्धात द्रोणाचा शिरच्छेद दृष्टद्युम्न करेपर्यंत संपतच नाही.  आणि यामध्येही अनेक लहान मोठी सूडचक्र सुरूच राहतात.  द्रौपदी स्वयंवर प्रसंगी कर्णाचा अपमान करते याचा प्रतिशोध कर्ण घेत राहतो, प्रत्येक वेळी तिला अपमानित करण्याची संधी शोधत.  दुर्योधनाला त्याची साथ मिळत जाते आणि त्यातून निर्माण होणारे  सूडचक्र तर सर्वांनाच गिळंकृत करते.  यातच मध्ये जन्मांधांच्या अंधारयात्रेचे चक्र आहे आणि डोळस गांधारीचे देखील. 

महाभारत युद्धाचा अंत देखील सूडचक्रामुळेच करुण झाला आहे.  आपल्या पित्याच्या हत्येने सूडाग्नी प्रज्वलित झालेला अश्वत्थामा, युद्ध संपल्यानंतर पांचालांच्या शिबिरात निद्रिस्त असलेल्या पांचाल सेनापती दृष्टद्युम्न, द्रौपदीची पाच मुले, शिखंडी इत्यादींची रात्री अमानुष हत्या करतो आणि या सूड  चक्राची पुढची पायरी गाठतो.  

अशा या संहार पर्वाचे वर्णन दाजी पणशीकरांनी व्यवस्थित उलगडून दाखवले आहे व ते देखील विविध श्लोकांचे प्रमाण देत, आणि त्यांचा अर्थ विशद करीत.  त्यामुळेच महाभारत कथानकातील बारीक-सारीक पैलू देखील एका वेगळ्या स्वरुपात आपल्या समोर उघड होतात. पणशीकरांचा महाभारताचा अभ्यास, त्यांचे त्यावरील चिंतन, आणि विषय समजावण्याची हातोटी केवळ अप्रतिम आहे व म्हणूनच महाभारताचे सूड हे अंग समजावून घ्यायचे असेल तर हे पुस्तक वाचणे आवश्यक ठरते. 


रविवार, १८ एप्रिल, २०२१

व्यासांचा वारसा - आनंद विनायक जातेगावकर

प्रथमावृत्ती - फेब्रुवारी २००९, तृतीय आवृत्ती - मे २०१६

व्यासांचा वारसा हे आनंद जातेगावकरांचे पुस्तक म्हणजे व्यासांचा, खरतर एक जादुई आरसाच आहे, ज्यात पाहून आपल्याला व्यास लख्खपणे दिसू लागतात.  ज्या गोष्टी महाभारतातून भांडारकर संस्थेच्या संशोधित प्रतीलाही वेगळ्या करता येऊ शकल्या नाहीत (कोणत्या ना कोणत्या तरी जुन्या हस्तलिखित प्रतींमध्ये असल्यामुळे) त्या  देखील या आरश्यात आपल्याला स्पष्टपणे ओळखता येऊ शकतात.  मात्र यासाठी हा आरसा पाहण्याचे कसब आत्मसात करणे, आपल्याला  आवश्यक आहे

जातेगावकऱ्रांचं एक निरीक्षण म्हणजे, स्वतः कथालेखक असलेले व्यास जे या कथेचा भाग आहेत, ते निर्वाणीच्या क्षणी या कथेत स्वतः हजर होतात, ते मोलाचा सल्ला देतात, सूचक बोलतात, मात्र कोणतीही भविष्यवाणी ते वर्तवित नाहीत.  ते दैववादी नाहीतच मुळी आणि यात कृष्ण सोडला,  तर इतर सर्व व्यक्तिरेखा मात्र,  दैववादाचा समर्थन करताना आढळतात व त्यातून वर, शाप, चमत्कार या संकल्पना उगम पावतात.  व्यास मात्र कोठेही यात  अडकत नाहीत.  जातेगावकर यातून हेदेखील सूचित करतात की,  या साऱ्या गोष्टी म्हणजे उत्तरकालीन भर.  व्यासांनी स्वतः कुठेही अशा प्रकारची वाक्ये टाकलेली नाहीत. 

महाभारतातील काही घटना प्रक्षेप कशा असतील हे आपल्याला जातेगावकर सुचवून जातात.  शरशय्येवर पडलेल्या भीष्मांनी,  युधिष्ठिराला केलेला उपदेश हा याच प्रकारातला.  राजाचं,  संसारी गृहस्थाचे वर्तन कसं असावं याबद्दल भीष्मांनी लावलेले पाल्हाळ पाहता हे अगदी पटते.  तीच गोष्ट वनपर्वातील सत्यभामा-द्रौपदी संवादाची.  उत्तरकालीन पुरुषी प्रवृत्तीला स्त्री वर्गाकडून / पत्नी वर्गाकडून, अपेक्षित असणाऱ्या साऱ्या गोष्टी द्रौपदी द्वारे वदविल्या गेल्या आहेत, हे पटवून देण्यात जोतेगावकर यशस्वी होतात. 

तीच गोष्ट युधिष्ठिर यक्ष संवादाची.  ब्राह्मणी वर्चस्वाला आवश्यक असणाऱ्या गोष्टी यक्ष युधिष्ठिर कडून वदवून घेतो व चक्क तळ्याकाठी मृत होऊन पडलेल्या पांडवांना जिवंत करतो.  भांडारकर संस्थेच्या श्री विष्णू सुखटणकर यांनी मांडलेल्या भृगू सिद्धांताचे हे आणखी एक उदाहरण. 

काही गोष्टींची उत्तरं जातेगावकर त्यांच्या प्रतीप्रश्नांनी आपल्या मनात तयार करतात.  भीष्म जिवंत असेपर्यंत शस्त्र हाती न धरण्याची करण्याची प्रतिज्ञा म्हणजे भीष्म मरणारच….  कौरवांचा पराभव होणारच….  याचे गृहीतक होते का?  “दर्जाने समान प्रतिस्पर्ध्यांशीच राजकुमार युद्ध करतात”  असे स्पर्धा प्रसंगी ठणकवणारे  कृपाचार्य, द्रौपदी वस्त्रहरण प्रसंगी गप्प का होते? सत्तेवरून कौरवांनी मध्ये ते शंभर असूनही दुही माजत नाही,  मात्र केवळ पाचच पांडवांना एकत्र ठेवायला एकाच द्रौपदीशी विवाह करावा लागतो, तो का ?  याच  द्रौपदीच्या विवाहाच्या वेळी व्यास येऊन द्रुपदाला, द्रौपदीच्या पूर्वजन्माची व शंकराच्या पाच पतीच्या वरांची गोष्ट का सांगतात? या सर्व गोष्टींचा उलगडा आपल्याला मनामध्ये होत राहतो. 

व्यास मात्र हे सर्व करून, कथानकात असून, स्वतः निर्विकार राहतात.  व्यासोत्तर काळात संपूर्ण संस्कृतीच कृष्णा च्या प्रेमात पडली व या अवतारवादाने महाभारतात हवी तशी भर घालून, त्याचं अगदी अंकोर वाटच्या मंदिरासारखं करून टाकले आहे.  त्याला जंगलानी  व वृक्षराजीने पूर्णपणे वेढून टाकले इतकं, की कधी कधी ते आतलं मंदिर ढळू नये म्हणून वाढलेल्या वृक्षांच्या शाखादेखील तोडता येत नाहीत, कारण तसं झालं तर, झाडांच्या मुळासह  मंदिराच्या ढाच्याला देखील धक्का लागू शकतो हि  जोतेगावकरांची हे समजावण्याची पद्धत पण अफलातून. 

पण हे असं असलं तरी हे पुस्तक वाचणं सोपं नाही.  महाभारतातले बरेचसे प्रसंग आरशात दाखवताना जातेगावकर गुढात  बोलतात.  अगदी या अंकोर वाटच्या मंदिरा सारख्या.  व म्हणूनच महाभारतातले बरेचसे प्रसंग यात सांगितले असले, तरी त्याचं मर्म समजायला आपल्याला ही गूढं सोडवावी लागतात व त्या पद्धतीत जातेगावकर व्यासांचा वारसा चालवीत आहेत असे मानता येते. 


गुरुवार, १५ एप्रिल, २०२१

हा जय नावाचा इतिहास आहे - आनंद साधले

 प्रथमावृत्ती - नोव्हेंबर १९६४ , चौथी आवृत्ती - ऑगस्ट २०१४

“युधिष्ठिराच्या पराभवाची गाथा” खरं तर हे या पुस्तकाचं नाव असायला हवं होतं असं हे पुस्तक वाचल्यानंतर वाटतं या पुस्तकात असं एकही पान नाही कि ज्यात  युधिष्ठीराला दूषणं दिलेली नाहीत.

पुस्तकाच्या नावावरून हे थोडक्यात वर्णिलेले महाभारत असावं असं मला वाटलं होतं.  प्रकरणांची नावे त्यांच्या संस्कृत श्लोकांची संक्षिप्त मराठी अर्थ आहे.  पण श्री आनंद साधले यांनी , वेचून वेचून युधिष्ठिराला नाव ठेवणारे श्लोक कसे निवडले असावेत?  याचं आश्चर्य वाटत राहतं.  श्रीकृष्णाचे मजबूत अधिष्ठान हे देखील या पुस्तकाचं आणखी एक वैशिष्ट्य.  पांडवांची वैगुण्य दाखवत ती श्रीकृष्णाने कशी झाकली,  हे दाखवत साधले यांनी श्रीकृष्णाचे गुणगान  केलं आहे.  आणि प्रत्येक प्रसंगात श्रीकृष्ण नसता तर काहीच कसं  होऊ शकलं नसतं,  हे दाखवत त्यांनी अर्जुना सह सर्व पांडव कसे प्रभावहीन ठरत हे रंगविले आहे. 

आणि हे करताना धृतराष्ट्र, दुर्योधन प्रभृतींचा त्रागा कसा समर्पक होता व त्यांचाच राज्यावर कसा प्रथम अधिकार ठरत होता हेदेखील त्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला आहे. यात कर्णावर वेळोवेळी झालेला अन्याय त्यांनी अधोरेखित करत कर्णाच्या पराभवांवर  व चुकांवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न देखील केला आहे. 

पण असे असले तरी १९६४ साली प्रसिद्ध झालेले त्यांचे हे पुस्तक महाभारताविषयी चा एक वेगळा व कदाचित विद्रोही दृष्टिकोण म्हणून अभ्यासायला हवे.  तसे झाले तरच  अभ्यासकांकडून त्यातील सत्याच्या खोलात जाण्याचे प्रयत्न होतील.  मात्र असे प्रयत्न न झाल्यास तो वाचक अभ्यासाच्या पातळीवर न जाता अगम्य महाभारतात हरवून जाईल. 

छोटी छोटी प्रकरणं, हे देखील या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे.  लेखक यातून तो तो प्रसंग रंगवत वाचकाच्या मनावर ठसवत जातो.  ही एक चांगली लेखन पद्धत आहे पण केवळ युधिष्ठिराची वैगुण्ये दाखवण्याच्या अट्टाहासापायी  हे वैशिष्ट्य वाया गेले असे वाटत राहते. 

शनिवार, १० एप्रिल, २०२१

व्यासांचे शिल्प, लेखक - नरहर कुरुंदकर

 (श्री विनोद थोरात यांच्या फेसबुक वॉल वरून साभार घेऊन संक्षिप्त केलेला पुस्तकअभिप्राय)

महाभारताचा अभ्यास विविध प्रकारे करता येतो. काही लोक संस्कृतीची परिवर्तने शोधण्यासाठी, काही लोक संस्कृतीची रूपे आणि विविधता शोधण्यासाठी तर काही लोक धर्मश्रद्धा म्हणून महाभारत वाचतात. 'व्यासांचे शिल्प' या पुस्तकात कुरुंदकरांनी महाभारताचा अभ्यास ऐतिहासिक दृष्टीने केलेला आहे.

महाभारतामध्ये प्रत्येक शतकात काहीना काही भर पडत गेली आहे. महाराष्ट्रामध्ये प्रचलित आणि लोकप्रिय असणारी महाभारताची प्रत म्हणजे 'नीलकंठी प्रत'. परंतु ही काही मूळ महाभारताची प्रत नाही याची सर्वांना जाणीव होती. निळकंठी प्रतीच्या जास्तीत जास्त मागे जाण्याचे उद्देशाने पुणे येथील भांडारकर प्राच्यविद्या संस्थेमार्फत कै डॉ सुखटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली १९२७ साली विद्वानांनी कार्य करण्यास सुरुवात केली. ही आवृत्ती तयार करण्यासाठी तेलुगू मधील आंध्र महाभारत, जावा येथील महाभारत, काश्मीर मधील शारदा प्रत, महाभारतावरील सर्वात जुनी टीका लिहिणारा देवबोध, महाभारत सारांश सांगणारा क्षेमेंद्र  याची 'भारतमंजिरी' अशा अनेक प्रतींचा अभ्यास करण्यात आला. शेवटी १९६६ साली महाभारताची चिकित्सक आवृत्ती तयार झाली. याला 'भांडारकर प्रत' असे म्हणतात. कुरुंदकर ही चिकित्सक आवृत्ती इस १००० च्या सुमाराची मानतात.

कुरुंदकर म्हणतात, महाभारत हा सातत्याने प्रक्षेप होत जाणारा ग्रंथ आहे. तसेच त्याचे अनेकदा पुनर्लेखनही झाले आहे. कोण एके काळी हा ग्रंथ भृगू ऋषी कुळाच्या हातात पडला आणि भृगुंनी आपल्या परंपरागत कथा महाभारतात बसवून दिलेल्या आहेत. गुप्तकाळात आणि त्यानंतरच्या काळातही महाभारतात फार मोठी भर पडलेली दिसते. चिकित्सक आवृत्तीच्या सहाय्याने गणपतीने महाभारत लिहिणे, द्रौपदीची अक्षय थाळी, दुर्वास ऋषीनी घेतलेली पांडवांची परीक्षा, द्रौपदी स्वयंवरातील कर्णाची भूमिका या सर्व आणि अशा अनेक गोष्टी मूळ महाभारतामध्ये नसून नंतर कोणीतरी घुसवण्यात आल्याचे कुरुंदकर सांगतात.  

दाजी पणशीकर यांनी लिहिलेले 'महाभारत - एक सूडाचा प्रवास', नारायण गोविंद नांदापूरकर यांनी व्यासांचे मूळ महाभारत, मुक्तेश्वर यांचे त्यावरील काव्य आणि मोरोपंतांचे 'आर्याभारत' या तीन ग्रंथांचा तुलनात्मक अभ्यास करून सादर केलेला प्रबंध, इरावती कर्वे यांनी लिहिलेले 'युगांत' यावर कुरुंदकरांनी वेगवेगळ्या लेखांमध्ये सविस्तर विश्लेषण केलेले आहे. 

भीष्माचे वर्णन कुरुंदकर पराक्रमी साधू म्हणून करतात. ज्ञानी, महात्मा, पुण्यवान, तपस्वी, साधू, नीतिमान, पराक्रमी, वैराग्यशाली, इच्छामरणी; पण कौरवांच्या बाजूने जन्मभर उभा राहिलेला आहे अशी भीष्माची लोकमानसातील प्रतिमा आहे. भीष्म म्हणजे पापाच्या बाजूने उभे राहिलेले पुण्य असं कुरुंदकर म्हणतात. कौरवांच्या बाजूने उभे राहून भीष्माने नक्की काय साध्य केले असाही प्रश्न कुरुंदकर विचारतात. ते म्हणतात जगाच्या व्यवहारात आपण सज्जन असणे पुरेसे होत नाही, सज्जनाची बाजू घेऊन दुर्जनाविरुद्ध लढावेही लागते. हे ज्याला जमत नाही त्याच्यासाठी सज्जनपणाचे मोल काय असा खरा प्रश्न आहे.

कृष्णा वरील लेखामध्ये कुरुंदकरांनी कृष्णाचा ऐतिहासिक अंगाने विचार केला आहे. कृष्ण जीवनातील चमत्कारिक घटनांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. कर्ण खरंच दुर्दैवी होता का आणि डोळ्यांवर पट्टी बांधून गांधारीने धृतराष्ट्रा विषयी निष्ठा प्रकट केली की त्यावर सूड उगवला त्याचेही विश्लेषण त्यांनी केले आहे.

 भगवद्गीते विषयी भाष्य करताना कुरुंदकरांनी लोकमान्य टिळकांचे 'गीतारहस्य' तसेच डॉ ग श्री खैर आणि दामोदर कोसंबी यांच्या लेखाचे विश्लेषण केले आहे. आज आपल्यापुढे १८ अध्यायांची जी गीता आहे ती मूळ महाभारतामध्ये नसून नंतर कोणीतरी कृष्णाच्या तोंडी घातली आहे असे निरीक्षण बहुतेकांनी नोंदविले आहे. पहिल्या टप्प्यातील गीतेमधील ज्ञान की कर्म, सांख्य की याग एवढेच प्रश्न होते. इ स च्यापूर्वी पहिल्या दुसऱ्या शतकात परमेश्वर ठरल्यावर त्याच्या तोंडी गीता आणि चौथ्या शतकापासून सहाव्या शतकापर्यंत गीतेमध्ये भक्तीमार्ग आला आणि आठव्या शतकापासून आज पर्यंत प्रत्येकाने आपल्या सोयीनुसार गीतेतून तत्वज्ञान काढले असे कुरुंदकर म्हणतात.

बरेच लोक महाभारत  इस पूर्व ३१०१ मध्ये घडले असे मानतात. आज बहुतेक लोकांना महाभारत केवळ टीव्हीवरील मालिका पाहूनच माहिती आहे. खूपच थोड्या लोकांनी ते वाचले असेल. परंतु महाभारताचा केवळ पौराणिक अथवा धार्मिक दृष्ट्या विचार न करता ऐतिहासिक दृष्ट्या ते अभ्यासायचे असेल आणि हजारो वर्षांच्या काळात भारतीय संस्कृतीत कसे परिवर्तन होत गेले हे जाणून घ्यायचे असेल नरहर कुरुंदकर यांचे व्यासांचे शिल्प हे पुस्तक वाचणे क्रमप्राप्त आहे.